Finance Management
आलीकडच्या काळात बहराला आलेलं फायनान्स मॅनेजमेंटचं आगळंवेगळं क्षेत्र. फायनान्स मॅनेजमेंट क्षेत्रातलं करिअर हे जितकं सन्माननीय आहे तितकंच ते आव्हानात्मकही आहे, असं म्हटलं जातं. फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे एका व्यापक अर्थाने पैशांचं व्यवस्थापन.
फायनान्स आणि मॅनेजमेेंट या दोन गोष्टी वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या आपल्या दैनंदिन आणि व्यावसायिक जीवनात सुव्यवस्था आणतात.
फायनान्स मॅनेजर वैयक्तिक व व्यावसायिक संदर्भातलं आर्थिक व्यवस्थापन करतात. व्यवसायाबाबतची आर्थिक धोरणं विकसित करणं आणि त्यांच्या अंमलबजावणीचा मूलभूत आराखडा तयार करणं, आर्थिक विवरणांचं विश्लेषण करून व्यवसायाच्या आर्थिक विकासासाठी योजना तयार करणं, अशी वेगवेगळी कामं या व्यवस्थापनात अंतर्भूत असतात.
नव्या बदलत्या जगात फायनान्स मॅनेजमेंट क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. व्यवसायाच्या आर्थिक धोरणांची आखणी व अंमलबजावणी करणारे फायनान्स मॅनेजर, गुंतवणुकीच्या संधींचं विश्लेषण करून निर्णय घेण्यासाठी मदत करणारे आर्थिक विश्लेषक, वित्तीय आणि गुंतवणुकीच्या बाबींचं व्यवस्थापन करणारे कोषाधिकारी, व्यक्ती किंवा कंपन्यांना नियोजन व गुंतवणुकीबाबत सल्ला देणारे आर्थिक सल्लागार, वित्तीय धोके ओळखून त्यांचं व्यवस्थापन करणारे रिस्क मॅनेजर तसंच ऑडिटर, इन्व्हेस्टमेण्ट बँकर, क्रेडिट अॅनालिस्ट अशी करिअरच्या संधींच्या शक्यतांची मोठीच्या मोठी यादी या क्षेत्राच्या पोटात सामावलेली आहे. अर्थात, या संधी मिळवण्यासाठी आणि अशा कामांमध्ये टिकून राहण्यासाठी वित्तीय विश्वातलं ज्ञान, विश्लेषणात्मक आणि व्यवस्थापन कौशल्यं कमवत राहण्याला पर्याय मात्र नाही.