सहज कुठेही आणि कधीही करता येण्याजोगा चल पद्धतीचा चांगला व्यायाम कोणता, असं जर आरोग्यतज्ज्ञांना विचारलं तर ‘भरभर चालणं’ हे उत्तर नक्की एकमुखाने येईल. भरभर याचा अर्थ चालताना व्यक्तीच्या नाडीच्या ठोक्याची गती वाढणं. प्रत्येक व्यक्तीच्या तंदुरुस्तीच्या स्थितीवर हा वेग अवलंबून असतो. जी व्यक्ती नियमाने व्यायाम करत असेल त्या व्यक्तीचे शांत स्थितीत नाडीचे ठोके संथ वेगाने पडत असतात. याउलट बरेच दिवस कोणताही व्यायाम न केलेल्या व्यक्तीच्या नाडीचे ठोके अगदी माफक श्रमांनीदेखील भरभर पडू लागतात. चालताना अगदी पावलांपासून खांद्यापर्यंतचे अनेक स्नायू कार्यान्वित होतात.
प्रत्येक स्नायूच्या आकुंचनाबरोबर स्नायूत असणारं रक्त नीलांमधून हृदयाकडे पाठवलं जातं. त्यामुळे हृदयाकडे येणार्या रक्ताचं प्रमाण बरंच वाढू लागतं. याचा परिणाम नाडीची व श्वसनाची गती वाढण्याकडे होतो. अशी वाढलेली गती हृदयाच्या स्नायूंना व्यायाम घडवते. असा व्यायाम दररोज अर्धा तास आठवड्यातले पाच दिवस केला तर रुधिराभिसरण आणि श्वसन या दोन्ही संस्था अधिकाधिक कार्यक्षम होऊ शकतात, असं तज्ज्ञ सुचवतात.
दुसरीकडे अजिबात दमछाक न होता पण अधिक काळ काम करत राहता यावं, या उद्देशाने जे व्यायाम करता येतात, त्यात व्यायाम करताना नाडीची गती फारशी वाढण्याची आवश्यकता नसते. उलट ते संथ गतीने केले तरच ते दीर्घकाळ करता येतात. संथ चालताना स्नायूंवर, सांध्यांवर, पाठीच्या कण्यावर, श्वसनावर ताण येत नाही. स्नायूंना आपलं काम करण्यास लागणारी ऊर्जा प्राणवायूचा वापर करून मिळवता येते. चयापचयावरही ताण येत नाही. म्हणूनच असं सांगितलं जातं की, संथ गतीने आठवड्याला आठ ते दहा तास चालणं हा वजन कमी करण्यासाठी उत्तम उपाय ठरू शकतो.