आजच्या जगात ताणाचं व्यवस्थापन करण्याचं कौशल्य अंगी बाणवण्याला पर्याय नाही, हे जितक्या लवकर आपण समजून घेऊ तितकं आपल्या हिताचं. जर आपण कामकरी, नोकरदार, व्यावसायिक असू तर कामाच्या ठिकाणी अनुभवाला येणाऱ्या ताणाचं व्यवस्थापन करता येणंही आवश्यकच.
अनिवार्य ताणाशी सामना करत आपल्या मानसिक-शारीरिक क्षमतांचा पुरेपूर वापर करून दिलेली कामं वेळेत आणि उत्तम प्रकारे पार पाडण्याचं कसब अंगी बाणवणं म्हणजे कामाच्या ठिकाणच्या ताणतणावाचं व्यवस्थापन करणं.
मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी अलीकडच्या काळात काही सोप्या पद्धती लोकप्रिय झाल्या आहेत. कामाच्या ठिकाणी असताना जाणवणाऱ्या ताणाच्या व्यवस्थापनात या पद्धती विशेष प्रभावी ठरू शकतात. कामाच्या ठिकाणी दुपारचं जेवण वेळेच्या चौकटीत; पण सावकाश खाण्याचा सराव करा.
तणाव कमी करण्याबरोबरच पचन सुधारण्यासही त्यामुळे मदत होऊ शकेल. काही मिनिटांसाठी कामातून ब्रेक घ्या, मोबाईलवर टायमर सेट करा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. फक्त शांत बसून मनात येणारे विचार व भावना यांचं निरीक्षण केलं तरी मन शांत करण्यास आणि तणावाची पातळी संतुलित राखण्यास हातभार लागू शकतो.
थोडा ब्रेक घ्या, थोडं चाला. शक्य असल्यास आसपासचा निसर्ग आणि सभोवतालच्या परिसराचा आनंद घ्या. ताणाला कारण ठरणाऱ्या काळजी व चिंतेची तीव्रता यामुळे कमी होऊ शकते. कामाचा ताण कमी करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे सहकाऱ्यांशी विचारपूर्वक व समंजस संवाद साधणं.
सहकाऱ्यांशी संवाद साधताना लक्ष देण्याचा सराव करा, ते काय म्हणत आहेत हे काळजीपूर्वक ऐका. कामाचा ताण असेल, तर आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी थोडा वेळ काढा.
डोळे बंद करा आणि आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे वळवा. श्वास शांत व मंद करण्याचा प्रयत्न करा. ताण नेमका कशामुळे आला आहे, हे समजून घेण्यासाठीही कामाच्या ठिकाणच्या या लहानशा ब्रेकचा उपयोग होऊ शकतो.