पैसे कमावणं, बचत करणं आणि त्यातून मिळणारं आर्थिक व निर्णय स्वातंत्र्य अनुभवणं या प्रत्येक व्यक्तीसाठी खास ठराव्यात अशा गोष्टी! आपलं शिक्षण, ज्ञान, अनुभव, छंद आणि आपल्यातली कौशल्यं जर नीट निरखली, पारखली आणि रोज आपल्याला दहा रुपये बचत करता येतील का असा विचार केला तर? आता कुणी म्हणेल, ठीक आहे! ठरवलं आहे ना..
हे बघा मी दहा रुपये गुणिले वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असे तीन हजार सहाशे पन्नास रुपये ठेवले बाजूला! झाली माझी बचत!, तसं नाही. ही बचत रोजच्या रोज व्हायलाच हवी. ‘एकच ठरावीक रक्कम (जी बाजूला टाकणं आपल्या नक्की आवाक्यात आहे अशी!) दररोज न चुकता वर्षभर’ हे गणित मोडायचं नाही, हा नियम! विचार करून पाहा- थोडेबहुत पैसे कमावणं आणि त्यातली ठरावीक रक्कम न चुकता बाजूला टाकणं हे आपल्यातल्या प्रत्येक व्यक्तीला नक्की जमू शकेल.
अर्थात, याचा ताण घ्यायची गरज नाही! अगदी साध्या पद्धतीने सुरुवात करता येईल. प्रत्येक महिन्याचं बजेट तयार करता येईल आणि त्यानुसार खर्च करण्याची सवय लावता येईल. अनावश्यक खर्च टाळून ते वाचवलेले पैसे बाजूला टाकता येतील. स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नातून चालणार्या बचत गटात सहभागी होता येईल.
दैनिक जमा अर्थात पिग्मी बचत योजनेत दररोज आपली रक्कम जमा करता येईल. घरच्या घरी शिवणकाम करून किंवा पापड, लोणची इत्यादी खाद्यपदार्थ बनवून विकता येतील. यातून कमाईही होईल आणि आपली हक्काची बचतही. आता कुणाच्या मनात येईल- अशा बचतीतून आर्थिक शिस्त लागते हे अगदी खरं; पण रोज एक रुपया, रोज दहा रुपये या गणितातून अशी कितीशी रक्कम उभी राहणार? एक लक्षात घ्यायला हवं की आपल्या बचतीची रक्कम किती लहान, किती मोठी हा मुद्दा गौण असतो.
महत्त्व असतं ते वेळेला. म्हणूनच कदाचित सणासुदीच्या काळात मजा करण्यासाठी किंवा अडचणीच्या काळात पैशांचा प्रश्न दूर करण्यासाठी अशा रकमा कितीही छोट्या असल्या तरी ‘अमूल्य’ ठरतात! शिवाय आपली बचत जर वापरली गेली नाही आणि त्या पैशांना पाय फुटू नयेत असं वाटत असेल तर सोनं खरेदी करणं किंवा ती रक्कम मुदत ठेवीमध्ये (एफ. डी.) गुंतवणं हे पर्यायही आपल्यापाशी असतातच. त्यामुळे आता वेळ दवडू नका अजिबात! बचत छोट्या पावलांनी केली जाते, हे मनाशी पक्कं करा आणि आजपासूनच रोजचे दहा रुपये बाजूला टाकायला सुरुवात करा!