Hair Care in Monsoon: Is it right to wash your hair daily during monsoon? What do hair experts say
पुढारी ऑनलाईन : पावसाळ्यात केसांशी संबंधित समस्या वाढतात. विशेषतः केस गळणे आणि टाळूशी संबंधित समस्या या काळात अधिक जाणवतात. त्यामुळे केसांची योग्य काळजी घेण्यासाठी आपल्या टाळूच्या त्वचेची स्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे.
पावसाळ्यात केसांशी संबंधित समस्या वाढत आहेत. केस गळण्याची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. यापैकी अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो दररोज केस धुतल्याने केस गळण्याची समस्या कमी होईल की आणखी वाढेल?
जर तुमच्याही मनात हा प्रश्न असेल, तर याचे उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे असू शकते. याबाबत हेअर एक्सपर्टने महत्त्वाची माहिती दिली आहे.
रोज केस धुवावेत का?
हे पूर्णपणे तुमच्या केसांची आणि टाळूची स्थिती कशी आहे, यावर अवलंबून असते. सर्वप्रथम दररोज किती केस गळत आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे. काही केस अधूनमधून गळत असतील तर ही सामान्य बाब असू शकते. मात्र, केस मोठ्या प्रमाणात गळत असतील तर टाळू ऑयली आहे की ड्राय, याकडे लक्ष द्यावे.
तुमच्या टाळूची त्वचा ऑयली असेल आणि तुम्ही दररोज घराबाहेर पडत असाल, तर रोज केस धुवू शकता. मात्र, त्यासाठी माइल्ड शॅम्पूचा वापर करणे अधिक योग्य ठरते.
जास्त केमिकल्स असलेल्या शॅम्पूचा दररोज वापर केल्यास केस कोरडे आणि निस्तेज होऊ शकतात. त्यामुळे केसांची समस्या कमी होण्याऐवजी केस अधिक गळण्याची शक्यता वाढू शकते.
या लोकांनी रोज केस धुण्याची गरज नाही
डर्मेटोलॉजी विभागातील डॉ. कीर्ती माहेश्वरी यांच्या मते, ज्यांची टाळू नॉर्मल किंवा ड्राय आहे, त्यांनी दररोज शॅम्पू करण्याची गरज नाही. अशा व्यक्तींनी आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणे पुरेसे आहे.
मात्र, पावसात केस भिजले असतील तर घरी आल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने नक्की धुवावेत. पावसाचे पाणी पूर्णपणे स्वच्छ असेलच असे नाही. त्यामुळे ते केस आणि टाळूसाठी नुकसानकारक ठरू शकते.
केस धुतल्यानंतर व्यवस्थित वाळवणे महत्त्वाचे
डॉ. कीर्ती यांच्या मते, पावसाळ्यात केवळ केस धुणे पुरेसे नाही, तर ते व्यवस्थित वाळवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
ओले केस बराच वेळ बांधून ठेवणे किंवा झाकून ठेवणे टाळूवरील ओलावा वाढवू शकते. त्यामुळे कोंडा होण्याची समस्या वाढू शकते. काही व्यक्तींमध्ये यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे केस धुतल्यानंतर ते व्यवस्थित कोरडे करणे गरजेचे आहे.