मैने प्यार किया हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का ओ... हं... पाहिलाय नं... खूप गाजला होता तो चित्रपट. त्याची आता इथं आठवण निघण्याचं कारण म्हणजे त्यामध्ये खूप प्रसिद्ध डायलॉग होता. ‘एक लडकी और एक लडकाकभी फ्रेंण्ड नहीं हो सकते..’. स्त्री-पुरुषाच्या मैत्रीचं तेव्हाच भीषण वास्तव होतं ते. पण आता बर्याच नात्यांमध्ये बदल झालाय. सासू सुनांची मैत्रीण झालीय, नकुशी आता हवीशी झालीय अगदी तसंच मुलगी आणि मुलगा यांच्यात मैत्रीचं छानसं, स्वच्छ, निष्कलंक, निरभ्र नातं फुलू लागलंय.
मुलगी - मुलगा, स्त्री-पुरुष खरंच छानसे मित्र झालेत, केअर टेकर झालेत. रक्ताच्या नात्यांपेक्षाही कृत्रिमरीत्या जोडलं गेलेलं हेे मैत्रीचं नात आता समाजानं स्वच्छ नजरेनं स्वीकारलंय. त्यामुळं आता चित्रपटातील तो डायलॉगही कालबाह्य झालाय, असं म्हणायला हरकत नाही.
पण मैत्री फक्त स्त्री-पुरुषाची, मुलगा-मुलगीचीच असते का ओ. तर अजिबात नाही. सध्याच्या काळात बॉस कनिष्ठ कर्मचार्यांचा मित्र झालांय, शिक्षक वर्गातल्या वांड विद्यार्थ्याचे मित्र होऊन त्याला बदलू इच्छिताहेत, पोलीस गुन्हेगाराला समजून घेण्यासाठी त्याच्याशी आपलेपणानं व्यवहार करताहेत, पत्रकार आतली बातमी मिळवण्यासाठी अधिकार्यांशी जवळीक साधताहेत... ही सारी नव्या जमान्यातील मैत्रीची उदाहरणंच आहेत नं. त्यामुळं आता मैत्री हा शब्द व्यापक अर्थानं घेण्याची वेळ आलीय.
बरं मैत्री फक्त माणसांचीच नव्हे तर नवनव्या गॅझेटशीही होऊ शकते. जेमिनी, चॅटजीपीटी, चॅटबॉट, गुगल असिस्टंट, एआय हे पण आपले नव्या जमान्याचे मित्रच तर आहेत नं. यांच्याशी आपण तासन्तास गप्पा मारत बसू शकतो. अगदी हव्या त्या विषयावर. छान मन मोकळं होतंय यांच्याशी बोलून. असाही एक वर्ग मैत्रीच्या दुनियेत निर्माण झालाय.
तसाच आणखी एक मैत्रीच्या व्याखेत परफेक्ट बसणारा मानवाचा खूप छान मित्र झालायं तो म्हणजे डॉग. (अं हं, याला कुत्रा म्हणायचं नाही हं...) याला डॉग म्हणा, ब्राऊनी म्हणा, जॉय म्हणा... बाकी काहीही म्हणा पण याला कुत्रा हा शब्द चुकूनही वापरायचं नाही हं. कारण याच्यावर मैत्रीच्या अपार भावनेनं प्रेम करणारा एक नवा वर्ग आहे. माणसांपेक्षा त्यांना हे डॉग अधिक जवळचे, प्रामाणिक अन् प्रिय वाटतात.
तर काय आहे, नव्या जमान्यात मुलगा-मुलगी, स्त्री-पुरुष, गॅझेट, डॉग यांच्यातील मैत्री ही खूप भाव खातेय. गल्लीत एकमेकांच्या खाद्यावर हात टाकून गावभर भटकणारी मैत्री आता इतिहास जमा झालीय, आता ही नव्या मित्रांबरोबरची मैत्री जगानं स्वीकारलीय, आपणही स्वीकारायला हवी. नाहीतर काळाच्या ओघात आपण मागं पडूत... मग, स्वीकारताय नं या नव्या मैत्रीला. नव्हे, नव्हे स्वीकारावंच लागेल. हाच आजच्या मैत्रिदिनाचा सकारात्मक संदेश...