तूरडाळ, मेथ्या, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, कांदा, तेल, गोडा मसाला, मोहरी, जिरं, हिंग, तिखट, चवीपुरतं मीठ.
दीड वाटी तुरीची डाळ आणि साधारणत: एक टेबलस्पून मेथ्या एक ते सव्वा तासासाठी पाण्यात भिजत घाला. पाण्यातून काढल्यावर व्यवस्थित निथळून घ्या. एकीकडे भांडंभर पाणी गरम करत ठेवा. दोन लहान चमचे तेलाची फोडणी करून घ्या. त्यात मोहरी, जिरं, हिंग घालून तडतडल्यावर जाड चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घाला. खमंग वास आल्यावर एकत्र भिजवून निथळून काढलेली डाळ व मेथ्या त्यात घाला. मंद आचेवर दहा-बारा मिनिटं परता.
कोरडं होऊ नये म्हणून वरून चमचाभर तेल सोडा. शिजून नीट मोकळ्या झालेल्या डाळीत हळद, मीठ आणि गरम करून ठेवलेलं पाणी घाला. व्यवस्थित ढवळून घ्या. ही पौष्टिक उसळ छान शिजल्यावर गरम मसाला व अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवा. उसळ नीट हलवून मुरण्यासाठी पाच-सात मिनिटं झाकून ठेवा. कढल्यात कडकडीत तापलेल्या तेलात ठेचलेला लसूण व किंचित तिखट घालून केलेली चटकदार फोडणी उसळीवर घाला आणि शक्य असल्यास भाकरीसह सव्र्ह करा.