मंगळसूत्र विकूनही खावा असा 'पुलासा'! आंध्रच्या सर्वात महागड्या माशाचं रहस्य file photo
फीचर्स

Pulasa Fish : मंगळसूत्र विकूनही खावा असा 'पुलासा'! आंध्रच्या सर्वात महागड्या माशाचं रहस्य

२० हजारांचा पुलासा मासा खाण्यासाठी दागिनेही विकावेत? तेलुगू म्हणीमागचं सत्य

पुढारी वृत्तसेवा

food why godavari pulasa fish is so expensive like 20 thousand per kilo in andhra pradesh know fish story

पुढारी ऑनलाईन : मांसाहार आवडणाऱ्यांना मासे खाण्याची विशेष आवड असते. मासे पचायला हलके असतात आणि अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध असतात. भारतातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे मासे लोकप्रिय आहेत. जसे पश्चिम बंगालमध्ये हिलसा (इलीश) तर आंध्र प्रदेशात पुलासा मासळीची मोठी क्रेझ आहे. आंध्र प्रदेशातील पारंपरिक जेवणात पुलासा मासळीला विशेष स्थान आहे. एवढेच नव्हे तर ही भारतातील सर्वात महागड्या मासळ्यांपैकी एक मानली जाते आणि तिची किंमत तब्बल २० हजार रुपयांपर्यंत पोहोचते. मग ही मासळी इतकी खास आणि महाग का आहे, ते जाणून घेऊया.

पुलासा मासळी इतकी खास आणि महाग का?

पुलासा मासळीच्या लोकप्रियतेचा अंदाज एका प्रसिद्ध तेलुगू म्हणीवरून येतो – "पुस्तेलु अम्मैना पुलासा तिनावाली", म्हणजेच "पुलासा खाण्यासाठी गरज पडली तर मंगळसूत्र किंवा लग्नातील दागिनेही विकावेत."

पश्चिम बंगालमधील हिलसाप्रमाणेच आंध्र प्रदेशातही नव्या जावयाच्या स्वागतासाठी पुलासा मासळीचा खास बेत केला जातो. तिची चव इतकी अप्रतिम असते की अनेक जण वर्षभर तिची वाट पाहतात.

बंगालची हिलसा आणि आंध्रची पुलासा या दोन्ही एकाच प्रजातीतील असल्या, तरी पुलासा मासळी समुद्रातून नदीपर्यंत मोठा प्रवास करत असल्याने तिची चव अधिक समृद्ध आणि वेगळी होते. ही मासळी जुलै ते सप्टेंबर या कालावधीतच उपलब्ध असते. त्यामुळे तिची मागणी प्रचंड वाढते. साधारणपणे तिची किंमत ५ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत असते, तर मोठ्या आकाराच्या पुलासा मासळीचा लिलाव २० हजार रुपयांपर्यंत पोहोचतो.

समुद्रातून गोदावरी नदीपर्यंतचा प्रवास

पुलासा मासळीची चव खास असण्यामागे तिचा अनोखा प्रवास कारणीभूत आहे. ही मासळी बंगालच्या उपसागरातील खाऱ्या पाण्यात वाढते आणि अंडी घालण्यासाठी गोदावरी नदीतील गोड्या पाण्यात प्रवेश करते.

समुद्रात तिला इलिसा (Ilisa) असे म्हणतात, तर नदीत आल्यानंतर ती पुलासा म्हणून ओळखली जाते. या प्रदीर्घ प्रवासादरम्यान तिच्या शरीरातील रचना आणि चव बदलते, त्यामुळे ती भारतातील सर्वात खास हंगामी खाद्यपदार्थांपैकी एक मानली जाते.

तज्ज्ञांच्या मते, जितका जास्त प्रवास ही मासळी करते, तितकी ती अधिक पौष्टिक आणि चविष्ट बनते. हा प्रवास म्हणजे जणू तिच्यासाठी एक प्रकारचा व्यायामच असतो.

पुलासा नदीत का येते?

पुलासा मासळी समुद्रातील खारे पाणी सोडून गोदावरी नदीत अंडी घालण्यासाठी येते. ताज कोरोमंडलचे एक्झिक्युटिव्ह सू-शेफ रवि वर्मा श्रीवास्तव यांच्या मते, गोड्या पाण्यात प्रवेश केल्यानंतर तिच्या शरीरातील चरबीचे प्रमाण बदलते आणि त्यामुळे तिची चव पूर्णपणे वेगळी होते.

हिलसा आणि पुलासा दिसायला जवळपास सारख्या असल्या तरी त्यांची चव मात्र स्पष्टपणे वेगळी असते.

आंध्र प्रदेशात सण-उत्सव असो किंवा जावई घरी येणार असो, पुलासा मासळीचा स्वयंपाक करण्याची परंपरा आहे. स्थानिक लोक ताजी मासळीच पसंत करतात. त्यामुळे गोठवलेली (फ्रोजन) पुलासा फारशी विकत घेतली जात नाही आणि ती फक्त हंगामातच खाल्ली जाते.

जावई घरी येणार असो, पुलासा मासळीचा स्वयंपाक करण्याची परंपरा

'पुलासा पुलुसु' ही आंध्रची प्रसिद्ध डिश आंध्र प्रदेशात पुलासा मासळीपासून प्रामुख्याने 'पुलासा पुलुसु' ही पारंपरिक करी तयार केली जाते. या मासळीवर इतर फारसे प्रयोग केले जात नाहीत.

ही करी पारंपरिक पद्धतीने मंद आचेवर रात्रभर शिजवली जाते. ती पूर्णपणे तयार होण्यासाठी सुमारे १६ ते १७ तास लागतात. त्यामुळे मासळीतील बारीक काटे मऊ होतात आणि करीची चव आणखी खुलते.

या करीमध्ये चिंच, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या आणि ठेचलेल्या लवंगांचा वापर केला जातो. शेफच्या मते, या पदार्थाचा खरा हिरो म्हणजे स्वतः पुलासा मासळीच आहे.

जर तुम्ही जुलै ते सप्टेंबर या कालावधीत आंध्र प्रदेशाला भेट देत असाल, तर पुलासा मासळीची ही खास पारंपरिक चव नक्की अनुभवून पाहा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT