बदलत्या जीवनशैलीमुळे दातांच्या व्याधींचे प्रमाण अलीकडे चांगलेच वाढू लागले आहे. त्यामुळे दातांची देखभाल करणार्या दंतवैद्यकांबरोबर (डेन्टिस्ट) डेन्टल हायजिनिस्ट या पदाचीही गरज निर्माण होऊ लागली आहे. दंतवैद्यक हा दातांच्या आरोग्याची निगराणी करण्याचे काम करतो. अशा दंतवैद्यकाला मदतीकरिता डेन्टल हायजिनिस्टची जरूरी असते. करिअरसाठी या डेन्टल हायजिनिस्ट या पदाचा आपण विचार केला पाहिजे. या क्षेत्रात उत्तम करिअर होऊ शकते.
डेन्टल हायजिनिस्टला डेन्टिस्टला मदत करण्याचे काम करावे लागते. डेन्टिस्टला मदत करताना दातांची सफाई करणे, त्याचे एक्स-रे घेणे, तसेच उपकरणे स्टरलाईज करणे, डेन्टल क्लिनिंग, स्केलिंग, पॉलिशिंग आणि डेन्टल इम्प्रेशन अशी कामे डेन्टल हायजिनिस्टला करावी लागतात.
डेन्टल हायजिनिस्ट हा रुग्णाची मेडिकल हिस्ट्री तपासतो तसेच रक्तदाब आणि अन्य गोष्टींचीही तपासणी करतो. आपल्या दातांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. दातांचे आरोग्य नीट न राखल्यामुळे दात, दाढा किडतात. या किडलेल्या दाढा काढून त्या ठिकाणी दुसर्या दाढा बसवणे, तसेच रूट कॅनलसारख्या शस्त्रक्रिया करून दातांचे आरोग्य कायम राखण्याचे प्रयत्न करणे, अशी कामे दंतवैद्यकाला करावी लागतात. आपल्या बिनधास्त जीवनशैलीमुळे दातांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात. दातदुखी चालू झाल्यावर किंवा दाढदुखी चालू झाल्यावर अनेकजण दंतवैद्यकाचा रस्ता धरतात. जेव्हा दुखणे हाताबाहेर जाते त्यावेळी डेन्टिस्टचा सल्ला घेण्याशिवाय आपल्या पुढे पर्याय नसतो.
डेन्टल हायजिनिस्टला डेन्टिस्टला मदत करण्याबरोबरच अनेक कामेही कारावी लागतात. मुख्य म्हणजे रुग्णाबरोबर संवाद साधून त्याला दाढ काढताना वा अन्य शस्त्रक्रिया करताना वेदना जाणवणार नाहीत याची दक्षता डेन्टल हायजिनिस्टला घ्यावी लागते. डेन्टल हायजिनिस्ट हा डेन्टिस्टबरोबर रुग्णालाही मदत करत असतो. अनेक रुग्ण दाढ काढून घेणे किंवा अन्य शस्त्रक्रिया करणे याला खूप घाबरत असतात. मात्र, डेन्टल हायजिनिस्ट हा रुग्णाच्या मनातील भीती आपल्या संवाद कौशल्यामुळे दूर करतो.
डेन्टल हायजिनिस्ट या पदावर काम करण्याकरिता अनेक रुग्णालयांबरोबरच खासगी डॉक्टरांबरोबरही काम करता येते. त्याचबरोबर नर्सिंग होम, रिसर्च डिपार्टमेंट, औषध कंपन्या येथेही डेन्टल हायजिनिस्टला काम करण्याची संधी आहे. कॉस्मॅटिक डेन्टिस बनून आपण स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकतो. डेन्टल कौन्सिलिंग ऑफ इंडिया, नवी दिल्ली याच्याशी संबंधित काही महाविद्यालयांत डेन्टल हायजिनिस्टचा अभ्यासक्रम शिकवला जातो. पाश्चिमात्य देशात डेन्टल हायजिनिस्टला मोठी मागणी असते. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे दातांच्या आरोग्याविषयी आता जागरूकता वाढतेय, त्यामुळे भविष्यात आपल्याकडे या पदावर काम करणार्यांची आवश्यकताही वाढणार आहे.