एज्युदिशा

‘हिट’ बनवणारं करिअर | पुढारी

Pudhari News

अपर्णा देवकर

मनोरंजनाचे जग प्रत्येकालाच हुरळून टाकते. अलिकडे डिजिटायजेशन (वेब सिरीज, यूट्यूब) ची लोकप्रियता वाढल्याने शॉर्ट फिल्मना मागणी वाढली आहे. देशात आणि देशाबाहेर  क्रिएटिव्ह वर्क करणार्‍या मंडळींना नावाबरोबरच पैसा कमावण्याची देखील संधी आहे. 

आपल्याला या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर चित्रपट निर्मितीशी निगडीत बारकावे शिकून फिल्म-टीव्ही कार्यक्रम तयार करण्यापासून जाहिरातपट, लघुपट, व्हिडीओ अल्बम आदींच्या माध्यमातून आपण ओळख निर्माण करू शकतो. 

चित्रपट माध्यमातून इंडियन मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री जगभरात अगोदरच पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात दरवर्षी सुमारे तीन हजार चित्रपटांची निर्मिती होते. भारतीय श्रोतेही मायानगरीचे चाहते आहेत. काही वर्ष अगोदर चित्रपट निर्मिती ही एक खर्चिक बाब मानली जात असे आणि त्यात विकासाची शक्यता कमी असायची. आता मात्र चित्र बदलले आहे. चित्रपट, मनोरंजन क्षेत्रात करिअर करायचे असल्यास कौशल्याबरोबर कष्ट करण्याची देखील तयारी असायला हवी. पहिल्या दोन-तीन चित्रपट, लघुपटातून यश मिळेल, असे नाही. आपल्याला कदाचित पाच-दहा वर्षेही लागू शकतात. म्हणून चिवटवृत्तीने काम करणार्‍या मंडळींना मायानगरी भरभरून प्रेम देते. 

ज्येष्ठ अभिनेते ए.के.हंगल यांचे चित्रपट करिअर वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर सुरू झाले होते. याचाच अर्थ असा या क्षेत्रात आपण कोणत्याही वयात, काळात प्रवेश करू शकतो.  गरज आहे ती फक्‍त काम करण्याची तयारी असण्याची. 

1960-70 च्या दशकात मनोरंजन क्षेत्र मर्यादित होते. मात्र कालांतराने विस्तार होत गेला आणि आता तर डिजिटायजेशनमुळे मनोरंजन क्षेत्रात क्रांतीच झाली आहे. डिजिटायजेशनच्या काळात लघुपटांचा बाजार अधिक वेगाने वाढत चालला आहे. सध्या लघुपट तयार करणे बर्‍याच प्रमाणात सोपे आणि कमी खर्चाचे आहे. अशा प्रकारचे चित्रपट तयार करण्यासाठी आपल्याला केवळ एक स्क्रिप्ट आणि एक चांगला मोबाईल असण्याची गरज आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अशा प्रकारचे चित्रपट आवडीने पाहिले जात आहेत आणि कमाई देखील होत आहे. साहजिकच क्रिएटिव्ह मंडळींसाठी आजघडीला चित्रपट निर्मितीत अधिकाधिक संधी उपलब्ध आहेत. म्हणूनच चित्रपट तयार करण्याचे वेड बाळगणारी युवा पिढी आज या उद्योगात करिअर करण्यासाठी अधिक उत्सुक दिसून येतात. या क्षेत्रात आपल्या आवडीनुसार अभिनय आणि दिग्दर्शनपासून प्रॉडक्शन, सिनेमॅटोग्राफी, स्क्रीन रायटिंग, साऊंड रेकॉर्डिंग, फिल्म एडिटिंगसारख्या कोणत्याही क्षेत्रात करिअर करू शकतात. 

चमकण्याची संधी- पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका अहवालानुसार 2020 पर्यंत इंडियन फिल्म इंडस्ट्री सुमारे 11.5 टक्के दराने विकास करण्याची शक्यता आहे. तसे पाहिले तर चित्रपट उद्योग मुळातच मोठा उद्योग आहे. या ठिकाणी टीव्ही-फिल्म डिव्हिजनमध्ये काम होतेच त्याचबरोबर इंटरनेटच्या प्रसाराने आज अनेक यूट्यूब चॅनेल्स बाजारात आले आहेत. या माध्यमातून दररोज नवनवीन चॅनेल्स उदयास येत आहेत. डॉक्युमेंटरी, अ‍ॅडव्हरटायझिंग, प्रमोशनल फिल्म्स, व्हिडीओ अल्बम किंवा व्हिडीओ गेम्ससारख्या शाखा देखील या चित्रपट उद्योगाच्या भाग आहेत. अशा ठिकाणी कुशल आणि क्रिएटिव्ह मंडळींची सतत गरज भासते. एवढेच नाही तर अलिकडच्या महिन्यात वेब मालिकेने चांगलाच वेग धरला आहे. त्यात नामांकित कलाकारांचा समावेश आहे. कोणत्याही चित्रपट निर्मिती 

उद्योगात प्री-प्रॉडक्शनपासून पोस्ट प्रॉडक्शनपर्यंत अनेक प्रकारचे काम होते. तेथे आपण आवडीनुसार क्षेत्राची निवड करू शकतो. अ‍ॅक्टर, एडिटर, डायरेक्टर, संगीतकार, गीत लेखन, पटकथा लेखन, संवाद लेखन, अ‍ॅक्शन मास्टर, सिनमॅटोग्राफर, नृत्यकलादिग्दर्शक, साऊंड इंजिनिअर, सेट डिझायनर, कॉस्ट्यूम डिझायनर आदीपैकी एकाची निवड करू शकता. घरातील टीव्ही सिरियलमधील वाढत्या लोकप्रियतेमुळे लहान पडदा म्हणजेच टेलिव्हिजनमध्ये युवकांना अनेक संधी आहेत. अनेक युवकांना आपली ओळख निर्माण करण्यासाठी चांगली संधी मिळत आहे. 

काल्पनिक शक्‍तीला वाव- चित्रपट उद्योग हा संपूर्णपणे क्रिएटिव्ह फिल्डवर अवलंबून आहे. यासाठी सतत कल्पनेचा आणि नावीण्याचा शोध घेणार्‍या मंडळींसाठी हे क्षेत्र अत्यंत उपयुक्त आहे. पदवी हातात पडताच नोकरी देणार्‍या एखाद्या कॉर्पोरेट जॉबप्रमाणे हे क्षेत्र नाही. याठिकाणी स्वत:चा मार्ग स्वत:च निवडावा लागतो. बहुतांश मंडळींना मोठमोठ्या पदव्या असूनही फिल्म मेकिंगमध्ये कौशल्य प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. म्हणूनच अभिनेता किंवा दिग्दर्शक होण्यासाठी टॅलेंटची गरज आहे. 

अभ्यासक्रम आणि पात्रता- या क्षेत्रात दीर्घकाळ टिकून राहायचे असेल तर आपल्या आवडीच्या अभ्यासक्रमाची निवड करूनच या क्षेत्रात यायला हवे. यातून आपण क्षेत्रातील मूलभूत गोष्टींचे चांगल्या रितीने आकलन होईल. हा अभ्यासक्रम एनएसडी, एफटीआयआय सारख्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. तसे पाहिले तर मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेले अभ्यासक्रम केल्याने चांगली सुरुवात होण्याची शक्यता बळावते. कोणत्याही प्रॉडक्शन हाऊस आणि चॅनलमध्ये सहजपणे काम करण्याची संधी मिळते. देशात अनेक संस्थांत चित्रपट निर्मितीत तीन वर्षाच्या पदव्यांपासून या क्षेत्रात वेगवेगळ्या शाखांत डिप्लोमा, पीजी डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध आहेत. 

अमर्यादित कमाई – फिल्म मेकिंगमध्ये कमाईला कोणतीही मर्यादा नाही. कारण ही इंडस्ट्री आपल्या कामाची दखल घेते. आपल्या कौशल्याला वेगवेगळ्या मार्गाने वापर करून अमर्यादित कमाई करू शकता. फिल्म मेकिंगमध्ये जर आपण तांत्रिक अभ्यास सुरू केला असेल तर सुरुवातीला 15 ते 20 हजार रुपये दरमहा सहजपणे मिळतात. हेच उत्पन्न कालांतराने लाखांपर्यंत पोचते. 

झीरो से हिरो – जर आपण एखादी स्क्रिप्ट लिहित असाल तर अनेक गोेष्टी आपण अनुभवातून, वातावरणातून नकळतपणे लिहित जातो. चुकांना घाबरू नका. आपल्या कुटुंबातील सदस्य मायानगरीत नसल्यास त्याची चिंता करण्याची गरज नाही. 

सुरुवातीला सर्वांनाच शून्यापासून सुरुवात करावी लागते. पुढे जाण्यासाठी टप्प्याटप्प्याने पावले टाकली तरच यशाची चव चाखायला मिळते. स्क्रिप्ट रायटर किंवा डायरेक्टर होणे हा एक प्रवास असतो. जर आपण या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यावर कायम राहा. संघर्षाच्या भीतीपोटी आपण हे क्षेत्र सोडू नका. ध्येय गाठण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही. 

प्रमुख संस्था – 

•फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे

•नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली

•सत्यजित रे फिल्म अँड •टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकाता

•एनआरएआय स्कूल, दिल्ली

•एडिट वर्क्स, नोईडा

•व्हिसलिंग वुडस इंटरनॅशनल, मुंबई.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT