जीवनात यशस्वी व्हायचे असेल किंवा काहीतरी करून दाखवायचे असेल, तर वेळेचे महत्त्व ओळखायला शिकले पाहिजे. लहानपणापासूनच आपण 'वेळ' ही किती मौल्यवान गोष्ट आहे, हे ऐकत आलेले असतो. आपल्याला ते पटलेलेही असते; मात्र वेळेच महत्त्व जाणून घेऊन त्याप्रमाणे वागणे आपल्याला जमत नसते. यालाच मराठीत 'कळते पण वळत नाही' असे म्हणतात.
(Time Management)
अनेकदा आपण एखाद्या कामाची सुरुवात ते काम निम्मे झाल्यावर त्यात रस वाटेनासा होतो म्हणून आपण ते सोडून देतो. अशा वेळी ते काम करताना आपण किती वेळ वाया घालवला आहे, याचा विचार करत नाही. सभा, व्याख्याने, पुस्तक प्रकाशन अशा कार्यक्रमांची वेळ ठरलेली असते.
मात्र, अनेकदा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेच उशिरा येतात. वेळेची किंमत न जाणण्याचे उदाहरण आपण नामवंत व्यक्तींकडूनच पाहतो. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाला वेळेवर जाण्याचे महत्त्व आपल्या लक्षातच येत नाही. आपण एखाद्याला वेळ दिली, तर त्या वेळेवर त्या ठिकाणी जाण्याचे आपल्या लक्षात येत नाही. पाच-दहा मिनिटे उशीर झाला म्हणून काय झाले, अशी आपली विचारसरणी असते; पण त्यामुळे आपण दुसऱ्याचाही वेळ फुकट घालवत असतो.
कॉलेजमध्ये, क्लासमध्ये कोणत्याही परिस्थितीत वेळेवर पोहोचायचे, असा निर्धार केलेले किती विद्यार्थी आढळतात? नोकरदार लोकही वेळ पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे कामे घेऊन येणाऱ्या लोकांचा वेळ वाया जातो. वेळ पाळणे म्हणजे वेळेचा गुलाम होणे, असा होत नाही. वेळ पाळण्याने आपल्या आयुष्याला एक शिस्त लागते.
आपण ठरवलेले काम त्या वेळेतच पार पाडले, तर आपल्या शरीराला आणि मनाला तशी सवय लागते. विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठून अभ्यासाला बसण्याचे बंधन स्वतःहून घालून घेतले नाही तर त्यांना अभ्यासासाठी वेळ कमी पडतो. पहाटे पाच ते आठ या वेळेत मी अभ्यास करणारच, असा निर्धार प्रत्येकानेच केला पाहिजे, अशा पद्धतीने नियमित अभ्यास केल्यास त्याचे चांगले परिणाम निकालात हमखास दिसतातच. अनेकांना कॉलेज संपल्यानंतर भरपूर वेळ असतो; पण ते हा वेळ इतरत्र भटकणे, टवाळक्या करणे, सिनेमे पाहणे यामध्ये घालवत असतात.
वास्तविक, या वेळेत अन्य भाषा शिकणे, किंवा एखाद्या तांत्रिक कौशल्याचा कोर्स लावता येणे शक्य असते. अन्य भाषा शिकल्यामुळे पदवीनंतर नोकरीसाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतात. त्यातून तुमचे करिअर उज्ज्वल होण्यास मदत होत असते. आपला एखादा मित्र टिच्चून अभ्यास करत असेल किंवा फावल्या वेळेत एखादा कोर्स करत असेल, तर त्याची टर उडवण्यात आपण धन्यता मानतो; मात्र याच कोर्सच्या आधारे त्याला चांगली नोकरी मिळते, तेव्हा आपले डोळे उघडतात. पण, त्यावेळी वेळ निघून गेलेली असते.
नोकरदार वर्ग आपल्या कामाच्या वेळात गप्पाटप्पा, चहा-पाणी करत बसतात, त्यामुळे त्यांचे काम तसेच राहते. परिणामी, अशा व्यक्तींना ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबून काम पूर्ण करून द्यावे लागते. हे टाळण्यासाठी वेळेच्या आत काम पूर्ण करण्याला महत्त्व दिले पाहिजे. उपलब्ध वेळेत काय करायचे, हे आपण स्वतः ठरवले पाहिजे. त्याप्रमाणे आपण वेळापत्रक करून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. असे झाले तर आपल्या शरीराला कोणतेही काम वेळत करण्याची शिस्त लागते. वेळेत काम करण्याची शिस्त लावून घेतली नाही तर आपल्या हातून एकही काम घड होत नाही.