एज्युदिशा

महाराष्ट्र दुय्यम  सेवा परीक्षा (PSI/STI/ASO) 

Pudhari News

मागील लेखात आपण स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायला हवे याचा सविस्तर आढावा घेतला. सदर लेखात आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित  गट-ब  परीक्षेविषयी माहिती घेऊ. 

प्रस्तुत परीक्षेमार्फत राज्य शासनाच्या सेवेतील पोलिस उपनिरीक्षक (PSI), राज्य कर निरीक्षक (STI) व सहायक कक्ष अधिकारी (ASO) या तीन पदांसाठी उमेदवार निवडले जातात. सदर परीक्षा ही दोन (STI व ASO पदांकरिता) व तीन (PSI पदासाठी) टप्प्यांत घेतली जाते, त्याचा तपशील खालीलप्रमाणे- 

पहिला टप्पा- संयुक्त  पूर्व परीक्षा (PSI, STI, ASO पदांकरिता)

दुसरा टप्पा- स्वतंत्र मुख्य परीक्षा (PSI, STI, ASO पदांकरिता)

तिसरा टप्पा- शारीरिक चाचणी व मुलाखत (फक्त PSI पदाकरिता)

म्हणजे STI व ASO निवडीसाठी पहिल्या दोन टप्प्यांनाच उमेदवारांना सामोरे जावे लागते. मात्र PSI पदासाठी जास्तीचा तिसरा टप्पा उमेदवारांना पार करावा लागतो. 

अर्हता – वरील तिन्ही पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहीत केलेली समतुल्य अर्हता असावी. 

या व्यतिरिक्त फक्त PSI पदासाठी खालील जास्तीची अर्हता असणे अनिवार्य असते. 

 पुरुष उमेदवार-  कमीत कमी उंची- 165 सें.मी. (अनवाणी) छाती न फुगविता – 79 सें. मी. (फुगविण्याची क्षमता 5 सें.मी.)

महिला उमेदवार-  कमीत कमी उंची- 157 सें. मी. 

पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणार्‍या उमेदवारांना पूर्व परीक्षा देण्यास परवानगी असते. मात्र, मुख्य परीक्षेला पात्र ठरल्यास मुख्य परीक्षा अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत  पदवी उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. 

पहिला टप्पा- संयुक्त पूर्व परीक्षा

याचा मुख्य उद्देश उमेदवारांची संख्या मर्यादित करणे, म्हणजेच एक प्रकारची चाळणी परीक्षा असल्याकारणाने पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जात नाहीत. 

पूर्वी तिन्ही पदांसाठी स्वतंत्र पूर्व परीक्षा घेतली जात असे. मात्र, परीक्षेचा अभ्यासक्रम, हेतू व उमेदवारांची होणारी आर्थिक व वेळेची गैरसोय लक्षात घेऊन आयोगामार्फत मागील काही वर्षांपासून तिन्ही पदांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. यासाठी उमेदवाराने अर्जात कोणत्या पदासाठी/ पदांसाठी तो/ती इच्छुक आहे याचा विकल्प द्यावा लागतो.                                                                                                                                                                                                                            – पूर्वार्ध

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT