विवेक कुलकर्णी
टर्म इन्शुरन्स घेताना बहुतांश लोकांच्या डोक्यात 50 लाख, 1 कोटी किंवा 2 कोटी असा एखादा ठोकळा आकडा असतो. कधी हा आकडा एजंटने सुचवलेला असतो, तर कधी तो आपल्याला पुरेसा वाटतो म्हणून आपण निवडतो. पण या प्रक्रियेत एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी अनुत्तरित राहतो : हा आकडा नेमका कशासाठी पुरेसा आहे?
तुमचा विमा कुटुंबाच्या नेमक्या कोणत्या गरजांचे रक्षण करणार आहे, हे स्पष्ट नसेल तर कोणताही टर्म इन्शुरन्सचा आकडा निरर्थक ठरतो. आर्थिक नियोजनातील असे अनपेक्षित आणि अंदाजे घेतलेले निर्णय भविष्यात खूप महागात पडू शकतात. म्हणूनच टर्म इन्शुरन्स ही गुंतवणूक नव्हे. तो संपत्ती निर्माण करण्यासाठी किंवा परतावा मिळवण्यासाठी नसतो. करबचत हा त्याचा दुय्यम फायदा आहे, विमा घेण्याचे मुख्य कारण नाही. टर्म प्लॅनचे एकमेव काम म्हणजे - तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाचे आर्थिक जीवन कोलमडू नये याची खात्री करणे. एकदा का हे उद्दिष्ट स्पष्ट झाले की, ‘किती रकमेचा विमा हवा?’ हा प्रश्न निव्वळ आकड्यांचा राहत नाही, तर तो तुमच्या जबाबदार्यांशी जोडला जातो.
विम्याने नेमके कशाचे रक्षण करावे?
तुमचे कुटुंब तुमच्या एकूण मालमत्तेवर नाही, तर तुमच्या मासिक उत्पन्नावर अवलंबून असते. हे उत्पन्न थांबल्यास त्याचा फटका कुटुंबाला तत्काळ बसतो. म्हणूनच, तुमच्या विम्याची रक्कम ही पुढील 10 ते 15 वर्षे तुमचे मासिक उत्पन्न भरून काढणारी असावी. विम्याची योग्य रक्कम ही तुमच्या कौटुंबिक परिस्थितीवर अवलंबून असते. जसे की, तुमचे लहान मूल आर्थिकद़ृष्ट्या सक्षम होण्यास किती वर्षे बाकी आहेत? तुमची पत्नी कमावती आहे का? आणि तुमच्या कुटुंबाची रचना कशी आहे? कुटुंबाला कठीण निर्णय घेण्याची वेळ येऊ नये म्हणून तुमच्या विम्यातून सर्व कर्जे पूर्णपणे फिटली पाहिजेत. तुमच्या पश्चात कर्जे नाहीशी होत नाहीत. हे कधीही विसरू नका.
योग्य नियोजन नसेल, तर ऐन संकटसमयी कुटुंबावर दबावाखाली मालमत्ता विकण्याची वेळ येऊ शकते. ही केवळ स्वप्ने नसून तुमच्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदार्या आहेत, ज्या विम्याच्या माध्यमातून पूर्ण व्हायलाच हव्यात. विम्याचे कव्हर निश्चित करण्याचा व्यावहारिक मार्ग म्हणजे तीन गोष्टींचा एकत्रित विचार करणे : उत्पन्नाची भरपाई, प्रलंबित कर्जे आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे. यामुळे तुमचे नियोजन केवळ अंदाजावर न राहता वस्तुस्थितीवर आधारित होते.
विम्याने हे केले पाहिजे...
उत्पन्न : पुढील 10-15 वर्षांच्या उत्पन्नाची सोय.
कर्जे : सर्व प्रकारच्या थकीत कर्जांमधून मुक्ती.
भविष्यातील उद्दिष्टे : मुलांचे शिक्षण व इतर महत्त्वाची उद्दिष्टे.
बहुतांशी लोकांचा विमा गरजेपेक्षा कमी!
बहुतांश लोकांचा विमा गरजेपेक्षा खूपच कमी असतो. विम्याची गरज मोजताना लोक सहसा तीन मोठ्या चुका करतात : भविष्यातील महत्त्वाच्या आर्थिक उद्दिष्टांचा विचार न करणे. भविष्यातील खर्चांचा अंदाज लावताना महागाईकडे दुर्लक्ष करणे. कंपनीकडून मिळणार्या विम्यावर अतिविश्वास ठेवणे. कारण नोकरी बदलताच किंवा सुटताच हे संरक्षण संपून जाते.
हे तीन प्रश्न स्वतःला विचारा...
1. तुमचे विमा कव्हर तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान 10 पट आहे का?
2. तुमचे विमा कव्हर तुमचे सर्वात मोठे कर्ज पूर्णपणे फेडू शकते का?
3. तुमच्या पश्चात तुमचे कुटुंब राहणीमानात कोणतीही तडजोड न करता जगू शकेल का?
यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेल, तर तुम्हाला तुमच्या विम्याच्या रकमेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. उत्पन्नाची सोय, कर्जे आणि भविष्यातील उद्दिष्टे या तीन आधारांवर तुमच्या विम्याचे गणित पुन्हा मांडा. तुमच्याकडे सध्या असलेले कव्हर आणि प्रत्यक्ष गरज यातील तफावत शोधा. जर ही तफावत मोठी असेल, तर ती वेळीच भरून काढणे शहाणपणाचे ठरेल.