एज्युदिशा

वैद्यकीय क्षेत्रातील करिअरचे पर्याय | पुढारी

Pudhari News

शालेय शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी करिअर जडणघडणीत मोलाचे असते. याच काळात करिअरची दिशा ठरते आणि त्यानुसार विद्यार्थी वाटचाल करत असतो. ज्यांना शास्त्रात आवड असते, तो विद्यार्थी विज्ञान शाखा निवडतात, ज्यांना आर्थिक क्षेत्रात रस आहे ते कॉमर्स शाखा निवडतात. विज्ञान शाखेतूनही आपल्याला अनेक करिअर निवडता येतात. जसे की इंजिनिअरिंग आणि मेडिकल अभ्यासक्रम. दोन्हीसाठी प्राथमिक विषय सारखेच असले तरी मेडिकलसाठी प्रवेश घेण्यासाठी बायोलॉजी आवश्यक आहे आणि इंजिनिअरिंगला जाण्यासाठी मॅथमॅटिक्स. काही विद्यार्थी दोन्ही विषय हाताशी ठरवून गुणांवरून करिअरचा मार्ग निवडतात. एमबीबीएस: बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी हा सर्वात मागणी असणारा वैद्यकीय अभ्यासक्रम मानला जातो. एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बायोलॉजी विषयाची निवड करतात. साडेपाच वर्षांचा अभ्यासक्रम असणार्‍या एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी आता सामाईक 'नीट' परीक्षा देणे गरजेचे झाले आहे. बारावी आणि प्रवेश परीक्षेत चांगले गुण आणि ग्रेड मिळाल्यानंतर एमबीबीएसला प्रवेश शक्य होतो. एमबीबीएस पदवी प्राप्त केल्यानंतर पहिले सहा महिने शासकीय रुग्णालयात इंटरशिप करणे गरजेचे आहे. त्यानंतर शासकीय किंवा स्वतंत्रपणे वैद्यकीय व्यवसाय करता येतो. त्याचप्रमाणे एमबीबीएसनंतर एमडीला प्रवेश घेता येतो. याठिकाणी एका विषयाची निवड करावी लागते. उदा. ऑर्थो, आय, न्युरो, हार्ट आदी. 

बीडीएस : बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी हा वैद्यकीय अभ्यासक्रम देखील पाच वर्षांचा असतो. एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाप्रमाणेच हा देखील अभ्यासक्रम असतो. यासाठी एक वर्षाचे इंटरशिप करणे गरजेचे असते. एमबीबीएसची तुलना करता बीडीएसला प्रवेश मिळणे तौलनिकद‍ृष्ट्या काही अंशी सोपे असते. 

बीएचएमएस : बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी या अभ्यासक्रमाला बारावीनंतरच गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश दिला जातो. ऑलोपॅथी, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी या उपचाराच्या पद्धती असून होमिओपॅथी उपचार पद्धतीवर आधारित असलेला बीएचएमएस अभ्यासक्रम असतो. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीत किमान 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे. बीएचएमएस कोर्स पाच वर्षांचा असून बारावीला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषय असणे आवश्यक आहे. 

बीएएमएस : बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी हा अभ्यासक्रम वैद्यकीय अभ्यासक्रमातील महत्त्वाचा मानला जातो. अत्याधुनिक उपचार पद्धतीला आयुर्वेदाची जोड या अभ्यासक्रमात करून देण्यात आली आहे. बारावीनंतरच आयुर्वेदिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. साडेपाच वर्षांच्या अभ्यासक्रमात एक वर्षाच्या इंटरशिपचा समावेश असतो. एमबीबीएसच्या तुलनेत या अभ्यासक्रमास प्रवेश मिळणे सोपे असते.

बीफार्मसी : केमिस्ट्री आणि फार्मस्युकिटल्स याचा एकत्रित अभ्यास म्हणजे बीफार्मसी होय. जर आपल्याला फार्मस्युकिटल क्षेत्रात करिअर करायचे असल्यास फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. या अभ्यासक्रमाला भारतातच नाही तर ऑस्ट्रेलियासारख्या देशातही चांगले महत्त्व आहे. बीफार्मसीच्या अभ्यासक्रमाचा कालावधी हा चार वर्षांचा आहे. त्यानंतर मास्टर डिग्रीही मिळवता येते. 10+2 नंतर बीफार्मसीला चांगल्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेश घेता येतो. 

डीफार्म : बारावीनंतर करण्यात येणार्‍या वैद्यकीय अभ्यासक्रमात डीफार्मसीचा समावेश होतो. डीफार्मची पदवी मिळवल्यानंतर मेडिकल स्टोअर्समध्ये जॉब करू शकतो आणि कालांतराने स्वत:चा व्यवसाय करता येतो. याशिवाय औषधी कंपन्यांमध्येदेखील डीफार्मला वाव आहे. डीफार्मसी केल्यानंतर बीफार्मला प्रवेश घेता येतो आणि दोन्ही पदवीनंतर एमफार्म देखील शिकता येते. 

अपर्णा देवकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT