एज्युदिशा

करिअरच्या फेरबांधणीसाठी ‘या’ ४ गोष्टी अवश्य करा

Arun Patil

[author title="प्रतीक्षा पाटील" image="http://"][/author]

पुढे जायचे असेल तर जोखीम पत्करण्याची तयारी बाळगायला हवी. वेळेवर काही निर्णय घेतल्यास ते भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. 'आऊट ऑफ बॉक्स' विचार करून करिअरची उभारणी करणे गरजेचे आहे. ढासळलेला आत्मविश्वास, सुरक्षिततेला प्राधान्य, नकारात्मक विचार, यामुळे करिअरपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. अशावेळी आपण काही गोष्टी केल्या, तर करिअरची फेरबांधणी होऊ शकते.

नोकरी करताना कालांतराने आपल्या स्वभावाला आणि कामाच्या वेगाला जडत्व येते. सकाळी उठून ऑफिसला जाणे, दिवसभर बॉसने सांगितलेले काम प्रामाणिकपणे पार पाडने आणि सायंकाळी घरी परतणे. एवढेच नाही, तर सुट्टीच्या दिवशी कुटुंबीयांबरोबर बाहेर फिरायला जाणे, अशा पद्धतीची चाकोरीबद्ध जीवनशैली तयार होऊ लागतेे. आपल्या आयुष्यात एकसुरीपणा येऊ लागतो आणि तेथेच आपल्या प्रगतीचा वेग मंदावतो. चांगली नोकरी, चांगला हुद्दा आणि चांगला पगार असल्याने आता आपल्याला निवृत्तीपर्यंत काही काळजी नाही, या विचाराने आपण नोकरीकडे पाहू लागतो. हा विचार करणे म्हणजे पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. चांगली नोकरी किंवा हुद्दा हे ध्येय न बाळगता काही तरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द किंवा सर्वांच्या पुढे जाण्याची इच्छाशक्ती बाळगण्याची गरज आहे, जेणेकरून तुमच्या साचलेल्या आयुष्यात प्रगतीचे रोपटे लावता येईल. शिव खेरा यांच्या मते, 'वेगळी माणसं काही वेगळं करत नाहीत, ती प्रत्येक गोष्ट वेगळी करत असतात.' प्रगतीची व्याख्या इतक्या सोप्या भाषेत अन्य कुणीही सांगितली नसेल. आव्हानं स्वीकारण्याची, नवे शिकण्याची जिज्ञासा, सकारात्मक विचार, संधी स्वीकारणे यासारख्या गोष्टीतून आपण आपले करिअर अधिक उज्ज्वल करू शकतो.

कधी कधी सुरक्षित नोकरीच्या नादात आपण करिअरवर परिणाम घडवून आणू शकतो. कमी वेतन असले तरी नोकरी पक्की आणि सुरक्षित आहे, असा विचार करून आपण आहे तेथेच थांबण्याचा प्रयत्न करतो. अन्य ठिकाणच्या नोकरीबाबत शाश्वती काय? असा विचार करून उगाचच भीत असतो. पुढे जायचे असेल, तर जोखीम उचलण्याची तयारी बाळगायला हवी. कौटुंबिक गरजा आणि नोकरी याचा ताळमेळ पाहून आपण वेळेवर काही निर्णय घेतल्यास ते भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. 'आऊट ऑफ बॉक्स' विचार करून आपण आपल्या करिअरची उभारणी करणे गरजेचे आहे. वय कमी असेल, कौटुंबिक जबाबदारी नसेल, तर अशावेळी युवक-युवतींना आकाश मोकळेच असते. संधी मिळाल्यास शहर सोडूनही आपण करिअरला दिशा देऊ शकतो. ढासळलेला आत्मविश्वास, सुरक्षिततेला प्राधान्य, नकारात्मक विचार यामुळे करिअरपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. अशावेळी आपण काही गोष्टी केल्या, तर आपल्या करिअरची पुनर्बांधणी होऊ शकते.

संधी स्वीकारणे : नोकरीच्या ठिकाणी आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नवीन आव्हान स्वीकारण्याची संधी मिळत असते. अशावेळी त्या आव्हानाला घाबरून न जाता ते स्वीकारण्याची तयारी ठेवा. अशा निर्णयामुळे आव्हान स्वीकारण्याची क्षमता वाढते तसेच आत्मविश्वासही वृद्धिंगत होतो. संधीचे सोने केल्यास वरिष्ठ मंडळीही आपल्यावर खूश राहतात आणि करिअरला एका उंचीवर नेऊन ठेवतात. कधी-कधी आपल्या कामाचे, गुणवत्तेचे कौतुक कंपनीत, कंपनीबाहेर होते. एखाद्या नामांकित कंपनीकडून आपल्याला चांगल्या जॉबची आणि पगाराची ऑफर येते. अशावेळी जुन्या कंपनीशी संबंध कायम ठेवून आपण नवीन संधीचे स्वागत केले पाहिजे. अशामुळे आपल्या करिअरच्या प्रगतीला आणखी बळ मिळते. सध्याच्या कंपनीत कामाचे कौतुक होत नसेल, वेतन मिळत नसेल, तर त्या ठिकाणी आपल्या कामात सुधारणा करून प्रगतीचा प्रयत्न करू शकतो किंवा अन्य ठिकाणी संधी शोधून आपल्या कारकिर्दीला उभारी देऊ शकतो.

कामाची नवीन पद्धत स्वीकारणे : कंपनीत नेहमी बदल होत असतात. त्यानुसार कामाच्या रचनेतही आधुनिकता आणून कामाचा वेग वाढविण्यावर भर दिला जातो. अशावेळी जुन्या आणि वेळखाऊ पद्धतीचा अवलंब केल्यास आपण अन्य सहकार्‍यांच्या तुलनेत मागे पडण्याचीच शक्यता अधिक असते. याउलट नवीन तंत्र शिकून आपण काळाच्या बरोबर आहोत, हे दाखवू शकतो. अन्य नवीन ठिकाणी काम करताना जुन्या कंपनीतील कामाचा फॉर्म्युला या ठिकाणी लागू होईलच याची खात्री नसते आणि ती लादण्याचीही जबरदस्ती करता कामा नये. याउलट नव्या कंपनीत त्यांचे तंत्र स्वीकारून कामकाजाला सुरुवात करणे कधीही चांगले.

सकारात्मक द़ृष्टिकोन : करिअरच्या प्रगतीतील महत्त्वाचा घटक म्हणजे सकारात्मक द़ृष्टिकोन. सकारात्मक स्वभाव नसेल, तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. सतत नकारात्मक विचाराने आपली प्रगती थांबते आणि पर्यायाने आपल्या कामावर विपरीत परिणाम होऊ शकतो. सकारात्मक द़ृष्टिकोन बाळगूनच करिअरची बांधणी केली पाहिजे. चांगली नोकरी, चांगली संधी ही आपल्याला सकारात्मक बाबींतूनच मिळू शकते. सकारात्मकतेमुळे संकटकाळातही आपण समर्थपणे उभे राहू शकतो आणि प्रश्नांवर मार्ग शोधू शकतो.

नवीन शिकण्याची तयारी : नोकरीत किंवा नवीन ठिकाणी सतत शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी नवीन शिकण्याची संधी मानली पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत, त्याची माहिती करून घेण्यासाठी कोणतीही लाज न बाळगता ती शिकून घ्यावी. आपले विचार लादण्याऐवजी नव्या विचारांचा, पुढारलेल्या व्यक्तींची कार्यशैली अंगीकारली, तर आपल्याला प्रगतीची शिखरे दिसू लागतात. अगदी कनिष्ठ कर्मचार्‍याकडूही अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. कनिष्ठाची हेटाळणी करण्यापेक्षा त्याच्याकडून चांगले काम करून घेणे आणि त्याने नवतंत्र बाळगल्यास ते समजून घेणे, हे प्रगतीचे लक्षण मानले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT