फीचर्स

Donkey Marriage for rain | पाऊस पडावा म्हणून गाढवाचं लग्न का लावतात? काय आहे प्रथा जाणून घ्या!

महाराष्ट्रातील दुष्काळी भागात आजही आहे ही लोकप्रथा, यंदाच्या पावसावर ‘अल निनो’ चे सावट

Namdev Gharal

Donkey Marriage for rain सध्या महाराष्ट्रात मान्सून लांबला आहे, मृग नक्षत्र कोरडेच गेले असून पाण्याअभावी पिके कोमेजू लागली आहे. तर अनेक शहरांमध्ये पाणी टंचाई सुरु झाली आहे. उपसाबंदीमुळे शेतीसाठी पाणी मिळेना झाले आहे, बोअरवेल, विहीरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे दुष्काळाची चाहूल लागली आहे, यावेळी महाराष्ट्रातील एक प्रथा समोर येथे, सोलापूर, सांगली या जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाऊस पडावा म्हणून गाढवाचं लग्न लावले जाते. अगदी माणसांच्या लग्नात ज्या प्रथा विधी असतात त्‍या या गाढवाच्या लग्नात केल्या जातात. तर ही प्रथा का पडली, खरचं पाऊस पडतो का की अंधश्रद्धा आहे हे पाहू.

पाऊसाने ओढ दिली की बळीराजाला आपल्या पिकांची संसाराची काळजी लागते. पाऊस पडावा यासाठी देवाला साकडे घातले जाते यातच गाढवाचंही लग्न लावले जाते. विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये अनेक वर्षांपासून चालत आलेली एक पारंपरिक लोकप्रथा आहे. जेव्हा कडक उन्हाळा असतो, दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते आणि मान्सून लांबतो, तेव्हा वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी हा अजब उपाय केला जातो.

काय आहेत धार्मिक समजुती

वरुण राजाला प्रसन्न करणे: जुन्या समजुतीनुसार, गाढवाचं लग्न लावून दिल्यामुळे पावसाचा देवता 'वरुण राजा' प्रसन्न होतो किंवा त्याला दया येते आणि तो पृथ्वीवर पाऊस पाडतो, अशी ग्रामीण भागात श्रद्धा आहे.

संकट निवारण: दुष्काळ हे एक मोठे संकट मानले जाते. अशा वेळी काहीतरी वेगळं किंवा विचित्र कृत्य करून निसर्गाचं लक्ष वेधून घेण्याचा हा एक पारंपरिक प्रयत्न असतो, जेणेकरून ते संकट टळावे.

खऱ्याखुऱ्या लग्नासारखेच केले जातात विधि

या लग्नासाठी एक नर आणि एक मादी गाढव निवडले जाते. त्यांना स्वच्छ धुवून, कपडे, फुलांचे हार आणि दागिने घालून वधू-वरासारखे सजवले जाते. गावातून बँडबाजा किंवा ढोल-ताशांच्या गजरात गाढवांची मिरवणूक (वरात) काढली जाते. ब्राह्मण किंवा गावातील ज्येष्ठ मंडळी गोळा होऊन मंत्रोच्चारात हे लग्न लावतात. उपस्थित लोक गाढवांवर अक्षता टाकतात. काही ठिकाणी लग्न झाल्यावर गावकऱ्यांसाठी जेवणाचाही बेत ठेवला जातो.

इतर प्राण्यांऐवजी गाढवाचंच लग्न का?

शेतकऱ्याकडे बैल गाय, म्हैस रेडा, बकरी, शेळी असे अनेक प्राणी असतात पण पाऊस पडावा म्हणून गाढवाचंच लग्न का केले जाते. गाढव हा प्राणी कष्ट, सहनशीलता आणि मूक वेदनेचे प्रतीक मानला जातो. अत्यंत कठीण परिस्थितीतही तो शांत राहून काम करतो. गावकऱ्यांच्या समजुतीनुसार, निसर्गाच्या कोपामुळे मानवासोबतच या मुक्या प्राण्यालाही पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे, हे दाखवण्यासाठी गाढवाची निवड केली जाते.

विज्ञानाच्या दृष्टीने ही पूर्णपणे अंधश्रद्धा

वैज्ञानिक दृष्टीकोणाचा विचार केला तर पाऊस पडणे ही भौगोलिक स्थितीवरव अवलंबून असते. जागतिक हवामानाचा परिणाम पावसावर होत असतो. तापमान वाढ, वादळ, बाष्पीभवन, हवेची दिशा इत्‍यादी अनेक घटक पावसासाठी कारणीभूत असतात त्‍यामुळे गाढवाचं लग्न ही पूर्णपणे एक अंधश्रद्धा ठरते. पण ग्रामीण भागात आजही पावसाची चातकासारखी वाट पाहणारे शेतकरी निसर्गाला साकडे घालण्यासाठी आणि मनाच्या समाधानासाठी ही लोकश्रद्धा किंवा प्रथा आनंदाने साजरी करतात.

इतर अनेक प्रथाही साजऱ्या केल्या जाता यामध्ये बेडकाचे लग्न, धोंडोबा किंवा धोंडीची पूजा, महादेवाला पाण्याचा अभिषेक (जलाभिषेक) भगवान शिव हे निसर्गाचे नियंत्रक मानले जातात. त्यामुळे पाऊस पडावा म्हणून शिवमंदिरांमध्ये विशेष विधी केले जातात. इत्‍यादी प्रथा पावसाला साकडे घालण्यासाठी केल्या जातात.

यंदाच्या पावसावर ‘अल-निनो’ चे सावट

हवामान तज्ञांच्या मते यंदा भारताच्या मान्सूनवर अल निनोचे सावट आहे. यामुळे भारतात यावर्षी कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. अल निनो ही एक हवामानाची स्थिती आहे. यामध्ये पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते, ज्यामुळे जगभरातील वाऱ्याची दिशा आणि हवामान चक्र बिघडते, भारतासारख्या देशात एल निनोमुळे मान्सून कमजोर होऊन अनेकदा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT