गोरक्ष शेजूळ, अहिल्यानगर
सध्या सोशल माध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. यात ‘इन्स्टाग्राम’ हा जणू गुन्हेगारीचा प्लॅटफॉर्म बनून तो शहरापासून गावखेड्यापर्यंत वेगात धावत आहे. यात एकमेकांचे आयडी मिळवणे, ओळख वाढवणे, बनावट अकाऊंट तयार करणे, बदनामीकारक मेसेज पाठवणे, पैशांची किंवा अन्य मागणी करणे, असे प्रकार राजरोस कानावर येत आहेत. दुर्दैवाने यात शक्यतो मुली आणि काही प्रमाणात महिलाही गुरफटल्या जात आहेत. नाहक बदनामी नको म्हणून कोणी पुढे येत नाही, तर काही धाडसी लोकं मात्र अशा गुन्हेगारांना अद्दल घडविण्यासाठी थेट पोलिसांत जाऊन तक्रार करतात. अहिल्यानगरमध्येही मागील सहा महिन्यांमध्ये असे नऊ गुन्हे दाखल असून, यात आर्थिक फसवणूक, तर अल्पवयीन मुले आणि मुली व महिला इन्स्टाग्रामची शिकार ठरल्या आहेत.
इयत्ता 10 वीच्या वर्गात शिकणारी मुलगी रात्री 10 वाजता इन्स्टाग्राम अकाऊंट पाहत असताना एका तरुणाच्या नावाच्या आयडीवरून तिला मेसेज येतो. थोडी ओळख होते, तू माझ्याकडे काम करशील का, तुला 20 हजार रुपये देईल, अशी विचारणा केली जाते, त्यावर तिने नकारात्मक उत्तर दिल्यानंतर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा फोटो कॉपी करून बनावट अकाऊंट तयार केले जाते, त्याखाली अश्लील मेसेज टाकून बदनामी केली जाते. त्या मुलीने बनावट अकाऊंट पाहिल्यानंतर त्या आयडीवर मेसेज पाठवून फोटो डिलिट करण्याची विनंती केली; मात्र त्याने तो फोटो डिलिट केला नाही. त्यामुळे त्या मुलीने अखेर सायबर पोलिसांत धाव घेतली. दुसर्या घटनेत उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीच्या अकाऊंटवरील फोटो कॉपी करून फेक अकाऊंट बनवले. त्यावरून तिच्या नातेवाईकांनाच तिची बदनामी होईल, असे मेसेज पाठवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. तिनेही पोलिसांत धाव घेतली.
तसेच, एका गृहिणीच्या व तिच्या मैत्रिणीच्या फोटोचे बनावट इन्स्टा अकाऊंट तयार करण्यात आले. या अकाऊंटवरून तिच्या नातेवाईकांना बदनामी करणारे मेसेज पाठवले जात असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकारही पोलिस ठाण्यातून पुढे आला. याशिवाय, 17 वर्षीय मुलीचे इन्स्टा अकाऊंट होते. तिचा फोटो वापरून बनावट अकाऊंट बनविण्यात आले. याच अकाऊंटवरून अनेकांना फे्रंड रिक्वेस्ट पाठवल्या जात होत्या. यातून बदनामी केली जात होती. याठिकाणी पोलिसांत धाव घेऊन न्याय मागण्यात आला. अन्य एका प्रकरणात तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षकांना वरिष्ठांकडून प्राप्त गोपनीय सीडी व पत्राच्या आधारे एका इन्स्टाग्राम प्रोफाईलधारकाने दोन लहान मुलांचे लैंगिक शोषणाचे फोटो प्रसिद्ध केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती. याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, इन्स्टा ही तरुणाईला भुरळ घालत असताना फेसबुक व इतर माध्यमांतून कमी कष्टात, कमी वेळात, जास्त व्याज, जास्त नफा, जास्त परतावा देणारी फसवी यंत्रणाही अॅक्टिव्ह आहे. शिर्डीतील विकास कुलकर्णी यांना फेसबुकवर लिंक दिसली. त्यांनी ती ओपन केली. यातून एका महिलेने शेअर ट्रेडिंग कसे करावे, याची माहिती दिली. तिच्या सांगण्यानुसार अकाऊंटवर पैसे टाकत गेले. त्यानंतर 50 लाखांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घरकाम करणार्या महिलेचे टेलिग्राम अकाऊंटवर एक मेसेज आला. जादा नफा देणारा एक टास्क पूर्ण करण्याच्या सूचना आल्या. नाव, वय, फोन नंबर व इतर माहिती दिली. त्यानंतर समोरून लिंक पाठवली. ती हिने ओपन केली. एका ग्रुपला जॉईन झाली. त्यावर मार्गदर्शन सुरू झाले. त्यानंतर 150 रुपये तिच्या बँक खात्यातही आले. त्यानंतर वेळोवेळी टास्क पूर्ण करण्यासाठी तिने 23 लाख रुपये समोरच्याच्या बँक खात्यात भरले. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
प्रवीण अंबादास राऊत आयटी इंजिनिअर, पुणे येथे काम करतात. इन्स्टाग्राम अॅपवरून त्यांना शेअर मार्केटची जाहिरात दिसली. यातून संपर्क वाढला. 20 ते 30 टक्के वाढीव नफ्याच्या आमिषाने त्यांची वेगवेगळ्या खात्यांवर 5 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाली.
राहुरीतील नवनाथ लाड या शिक्षकाचे यूट्यूबवर शैक्षणिक चॅनेल आहे. अज्ञात इसमाने त्यांचे चॅनेल हॅक करून त्यांचा मोबाईल नंबर बदलला. या चॅनेलच्या माध्यमातून ते शैक्षणिक प्रयोग सादर करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत होते. अशाप्रकारे सायबर गुन्हे घडताना दिसत आहेत.
अनेकदा फेसबुक, इन्स्टा अशा माध्यमांतून एक लिंक पाठवली जाते. कधी फोन कॉल्सद्वारे तुमचे एटीएम, तर कधी बँक अकाऊंट बंद पडणार असल्याची भीती दाखवून ओटीपी घेतला जातो. तो ओटीपी दिल्यानंतर लगेचच आपल्या खात्यातून रक्कम काढून घेतली जाते. मात्र, ही बाब लक्षात आल्यानंतर तत्काळ सायबर पोलिसांशी किंवा ऑनलाईन तक्रार नोंदविल्यास आपल्या बँक खात्यातून ज्या खात्यात रक्कम वर्ग झाली आहे, त्या खात्याला फ्रीज केले जाते. यातून पुन्हा आपल्या खात्यात ती रक्कम येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशावेळी प्रसंगावधान ठेवावे, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आज तरुणाईसह प्रोढ वयोगटातही इन्स्टाची क्रेझ आहे. तासन्तास त्यात ते गुरफटून जातात. हेच ओळखून समोरच्या बाजूने काहीजण चुकीचा वापर करतात आणि यातून गुन्हे घडतात. यामध्ये मुलींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कोणाचे बनावट अकाऊंट किंवा त्यावरून बदनामी केली जात असेल, तर घाबरून न जाता तत्काळ सायबर पोलिस किंवा जवळच्या पोलिस स्टेशनची संपर्क करावा. तसेच इन्स्टा, फेसबुकवर येणार्या लिंकची सत्यता ओळखूनच पुढे खरेदीचे किंवा गुंतवणुकीचे व्यवहार करावेत. अनेकदा येथेही फसवणूक झाल्याच्या तक्रारी येतात. पोलिस प्रशासन तुमच्यासोबत आहेच; मात्र आपणही एक सुजान, सुशिक्षित व जबाबदार नागरिक म्हणून सोशल माध्यमांची, त्यावरील लिंक, फे्रंड रिक्वेस्ट, अॅडव्हरटाईज इत्यादीबाबत विश्वासार्हता पडताळूनच त्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.