आशीष शिंदे, कोल्हापूर
सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याचे वेड आज लाखो तरुणाईला लागले आहे. इन्स्टाग्राम, फेसबुकवरील हजारो फॉलोअर्स हेच आता प्रतिष्ठेचे लक्षण बनले आहे. पण तरुणाईच्या याच हव्यासाचा गैरफायदा घेत, सायबर चोरटे फॉलोअर्स वाढवून देण्याच्या नावाखाली अनेकजणांना गंडा घालत आहेत.
साक्षी ही फॅशनमध्ये रस असलेली कॉलेजमधली मुलगी. सतत नवे ड्रेस, फोटोशूटस् आणि रील्स बनवून ती इन्स्टाग्रामवर टाकायची. पण अजून फॉलोअर्स हवे आहेत, या एकाच विचाराने तिचे मन कायम व्यापलेले असायचे. एके दिवशी तिला मेसेज आला. 500 फॉलोअर्स फ्री, अजून हवे असतील तर 399 मध्ये 5,000 फॉलोअर्स मिळवा! आकर्षक ऑफर पाहून तिचे मन भुलले. तिने लगेच दिलेली लिंक ओपन केली आणि पेमेंट अॅपमधून पैसे पाठवले.
दुसर्या दिवशी खरंच काही फॉलोअर्स वाढले. आणखी फॉलोअर्ससाठी तिने पुन्हा एकदा रिक्वेस्ट टाकली. पण यावेळी तिचा आनंद जास्त काळ टिकला नाही. लिंक ओपन करून पेमेंट केल्याने सायबर चोरट्यांकडे तिचे अकाऊंट डिटेल्स गेले. त्यानंतर तिला काही कळण्याआधीच तिचे खाते रिकामे झाले. इतकेच नाही तर तिचे अकाऊंट अचानक लॉगआऊट झाले. पासवर्ड बदलून टाकला होता. त्या अकाऊंटवरून साक्षीच्या मित्र-मैत्रिणींना मेसेज जाऊ लागले, मी अडचणीत आहे, तातडीने पैसे पाठवा. काहींनी खरंच मदत म्हणून पैसेही पाठवले. साक्षी हादरून गेली. फॉलोअर्स मिळवण्याच्या नादात तिने स्वतःचे अकाऊंटच गमावले होते. तिचे नाव, तिची प्रतिष्ठा आणि मित्रांचा विश्वास डळमळीत झाला.
सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याची अनेकांना हाव असते. इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर हजारो फॉलोअर्स हवेत, हे आज प्रतिष्ठेचे नवे मापदंड बनले आहे. या हव्यासाचा गैरफायदा घेत सायबर चोरटे फॉलोअर्स गेनच्या नावाखाली सापळे रचतात. हा स्कॅम साधारणपणे दोन-तीन मार्गांनी केला जातो. सर्वात सामान्य म्हणजे मेसेज किंवा डीएममधून येणारी लिंक. 1000 फॉलोअर्स फ्री मिळवा किंवा 10,000 फॉलोअर्स फक्त 499 रुपयांत असे मेसेज येतात. त्या लिंकवर क्लिक केल्यावर इन्स्टाग्रामसारखे दिसणारे खोटे पेज उघडते आणि पासवर्ड टाकताच अकाऊंट हॅकर्सच्या ताब्यात जाते. काहीजण अॅप्स डाऊनलोड करायला सांगतात. वापरकर्ते लॉगिन केल्यावर त्यांचा संपूर्ण डेटा चोरीला जातो.
याशिवाय अनेकदा यूपीआयद्वारे पैसे मागितले जातात. ‘499 द्या आणि लगेच फॉलोअर्स मिळवा’, असे सांगून पैसे घेतले जातात. पण पैसे गेल्यावर फॉलोअर्स येत नाहीत. काही वेळा नकली बॉट अकाऊंटस् जोडले जातात. पण काही दिवसांत ते गायब होतात किंवा इन्स्टाग्राम अशा अकाऊंटस्वर संशय घेऊन ते थेट ब्लॉक करतो.
यापासून वाचण्यासाठी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. मोफत किंवा पैशाने फॉलोअर्स मिळवून देण्याच्या ऑफरला बळी पडू नये. इन्स्टाग्राम, फेसबुक कधीही पासवर्ड मागत नाहीत, हे लक्षात ठेवा. नेहमी मजबूत पासवर्ड वापरावा आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवावे. थर्ड पार्टी अॅप्स किंवा वेबसाईटस्वर लॉगिन करणे टाळावे आणि संशयास्पद लिंक अथवा डीएम लगेच डिलिट करावा. जर अकाऊंट हॅक झाले तर तक्रार नोंदवावी किंवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.