यड्राव : वार्ताहर
शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून करण्यात आला. अनिल शिवाजी मासाळ (वय २५, रा. बिरोबा मंदिर जवळ संगमनगर, खोतवाडी) असे मृताचे नाव आहे. ही घटना पार्वती औद्योगिक वसाहतीत बंद अवस्थेत असलेल्या शेरलेकर प्रोसेसमध्ये घडली. आज दुपारी चार वाजता हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली.
मृत अनिल मासाळा हा शिवाजीनगर इचलकरंजी हद्दीतील २०१६ मध्ये खुनातील आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. मारेकऱ्यांच्या शोधासाठी विविध पथके रवाना केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.