खानिवडे (जि. पालघर) : पुढारी ऑनलाइन डेस्क । मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील मांडवी पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत असलेल्या कणेर टोकरे पाडा गावच्या पिरकुंडा हद्दीत होळीच्या दिवशी धडाशिवाय एका महिलेचे शीर आढळून आल्याने विरार हादरले होते.
ती महिला कोण, तिला असे का मारले, तिला का मारले असावे, यात इतक्या क्रूरपणे मारणारा कोण क्रूरकर्मा असावा असा प्रश्न पोलिसांना पडला होता. तर या प्रश्नांनी या परिसरातील रहिवाश्यांच्या चर्चांना उधाण आले होते. तर जेथे हे शीर सापडले तो भाग दिवसाही निर्मनुष्य असल्याने पोलिसांची तपासाची डोकेदुखी अधिक वाढली होती. मात्र गुन्हे कक्ष 3 च्या पोलिसांनी मोठ्या कौशल्याने या हत्येच्या गुन्ह्याचा शोध लावून नालासोपाऱ्यातून गुन्हेगाराच्या मुसक्या अवघ्या 24 तासात आवळल्याने पोलीसांचे कौतुक करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी आहे की, होलिका दहनासाठी सुकी लाकडे आणण्यासाठी पिरकुंडा येथील रहिवाशी रस्त्या शेजारील जंगलात गेले होते .तेव्हा त्यांना अनोळखी महिलेचा धडापासून गळा कापलेल्या अवस्थेतील मुंडके दिसून आले होते. या हत्येची खबर मिळताच मांडवी पोलीसांनी घटनास्थळाच्या जागेवर जाऊन पाहणी केली असता एका महिलेचे धड पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने टाकून मुंडके गोण्यांमध्ये व जांभळ्या रंगाच्या ट्रॅव्हलींग बॅगेत भरून पिरकुंडा दर्गापासून १०० मिटर अंतरावर रोडच्या कडेपासून ३० फुट अंतरावर खोलगट व झाडेझुडपे असलेल्या जागेत टाकून पुरावा नष्ट करण्यासाठी फेकून दिलेले दिसून आले होते.
गुढ हत्येचा कुठलाही ठोस पुरावा नसताना त्या ठिकाणी एका ज्वेलरी शॉपचे पाकीट प्राप्त झाले होते. सदर पाकिटावरील ज्वेलरी शॉपच्या मालकाला संपर्क साधून मिळवलेल्या माहिती नुसार मृत महिला ही तिच्या परिवारासह मुंबई परिसरात राहत असल्याचे समजले. मात्र सदरचा परिवार हा मागील काही दिवसांपासून इतर ठिकाणी राहवयास गेल्याचे व ते कुटुंब पश्चिम बंगाल येथील असल्याचे पोलिसांना समजले. त्यात पोलिसांनी मिळवलेल्या संपर्कातून त्या कुटुंबाच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला.यात त्या मृत महिलेचे नाव उत्पला हरिश हिप्परगी व पती हरिश बरवराज हिप्परगी असे असुन त्यांच्याशी कुटुंबाचा दोन महिन्यापासुन संपर्क होत नसल्याचे पोलिसांना तपासात दिसून आले होते.
त्याअनुषंगाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन हरिश बरवराज हिप्परगी, (वय 41, मूळ राहणार कर्नाटक) या इमीटेशन ज्वेलरीचा धंदा करणाऱ्या तिच्या पतीला नालसोपारा पूर्वेच्या एका इमारतीतून ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत मृत पत्नी उत्पला हिच्या बरोबर त्याचा गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. यात 08/01/2025 रोजी रात्री देखील घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. त्यामुळे नेहमीच्या भांडणाला कंटाळून बरवराज याने रागाच्या भरात त्याच रात्री 3:00 वाजेच्या सुमारास त्याचे पत्नीचा गळा दाबुन तिला जिवे ठार मारले. व मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतुने मुंडके शरिरापासून वेगळे करुन ते एका ट्रॅव्हल बॅगमध्ये टाकुन पिरकुंडा येथील झाडाझुडपात फेकून दिले. तर तिचे बाकी शरीर हे देखील एका गोणीत भरुन दुसरीकडे फेकले. गुन्हे पोलिसांनी बरवराज याला आता पुढील कारवाई करीता मांडवी पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास मांडवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे हे करीत आहेत.
24 तासांत वरील हत्येचा गुन्हा उघड करण्यात गुन्हे कक्ष शाखा 3 चे पोलीस निरीक्षक / शाडुराज रणवरे, सहा. पो. निरी. सुहास कांबळे, पो.हवा. मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, पो.अं. राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जायच, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, म.सु.ब. सागर यांनी सहभाग घेतला होता.