पुण्यातील व्यावसायिकाच्या हत्येचे गोवा कनेक्शन! pudhari photo
क्राईम डायरी

गुढ कायम! पुण्यातील व्यावसायिकाच्या हत्येचे गोवा कनेक्शन! संशयितानेही जीवन संपवले

Vinayak Naik Murder Case : कोण होता गुरुनाथ राणे?

पुढारी वृत्तसेवा
दीपक जाधव, पणजी

पुणे स्थित व्यावसायिकाचा कारवार येथील हणकोण येथे घरात घुसून धारदार शस्त्रांनी वार करीत हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्याची पत्नीही गंभीर झाली. पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली आहे, यात गोवा कनेक्शन असल्याचे उघड झाले. तपास सुरू असतानाच अवघ्या चौथ्या दिवशी यातील मुख्य संशयित असलेल्या गोव्यातील मद्य व्यावसायिकाने मांडवी खाडीत उडी मारून जीवन संपवले. या प्रकारामुळे गोव्यात एकच खळबळ उडाली. मात्र, हत्या आणि जीवन संपवल्याचे गूढ अद्यापही कायम आहे...

कारवार येथील हणकोण येथे पुण्यातील 58 वर्षीय व्यावसायिक विनायक नाईक ऊर्फ राजू (Vinayak Naik Murder Case) यांच्यावर त्यांच्या घरात घुसून एका टोळक्याने धारदार शस्त्राने वार केले. यात ते जागीच ठार झाले. या हल्ल्यात त्यांची पत्नी वृषाली याही गंभीर जखमी झाल्या. विनायक हे पुण्यात इलेक्ट्रिकलचा व्यवसाय करत होते. ते 3 सप्टेंबर रोजी हणकोणला आले होते.

विनायक नाईक यांची बहीण श्रुतिका राणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ती आणि तिचा मोठा भाऊ माधव काशिनाथ नाईक हे मुंबईहून रेल्वेने कारवारला आले, तर विनायक आणि त्यांची पत्नी शनिवारी त्यांच्या कारने कारवार शहरात उतरले होते. त्यांची आई सुरेखा काशिनाथ नाईक यांच्या श्राद्धाचे विधी करण्यासाठी ते कारवारला आले होते. विधी झाल्यानंतर श्रुतिका त्याच जिल्ह्यात असलेल्या तिच्या घरी परतली, तर विनायक आणि वृषाली हे रविवारी 8 रोजी सकाळी 6 वाजता पुण्याला जाण्यासाठी निघणार होते. मात्र, पहाटेच हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली.

श्रुतिकाने विनायकशी पहाटे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कॉल घेतला नाही. त्यानंतर तिने वृषालीला पहाटे 5.45 वाजण्याच्या सुमारास पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कॉलवर कोणी तरी सांगितले की, अज्ञातांनी विनायकला मारहाण केली आहे. श्रुतिका राणे यांनी तत्काळ मोठा भाऊ माधव नाईक यांना माहिती देऊन घरी धाव घेतली. तिथे विनायकचा जागीच मृत्यू झाला होता, तर वृषालीला कारवार येथील रुग्णालयात नेण्यात आले होते.

या प्रकरणी चित्ताकुला पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) (हत्या), 109 (1) (मृत्यूला कारणीभूत ठरणे), 329 (3) (गुन्हेगारी कृत्य) आणि 3 (5) (सामान्य हेतूने गुन्हेगारी कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासात घरात कोणत्याही प्रकारची चोरी झालेली नसल्याचे दिसून आले आहे. तसेच हल्लेखोरांनी विनानंबर प्लेटची गाडी वापरल्याने विनायक यांच्या हत्येमागे अन्य कारणे असल्याची शक्यता बळावली. पोलिसांच्या तपासात या हत्येमागे गोवा कनेक्शन असल्याचे उघड झाले. त्यानुसार बिहार येथील अजमल जाबीर, मासूम मंजूर या दोघांना दिल्ली पोलिस आणि रेल्वे पोलिसांच्या सहाय्याने दिल्लीत अटक केली आहे. आसाम येथील लक्ष्य ज्योतिनाथ याला गोवा विमान तळावर अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत याचा हत्येचा मुख्य सूत्रधार गोव्यातील गुरूप्रसाद राणे हा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

विनायक यांच्या हत्येचा तपास सुरू असतानाच यातील मुख्य संशयित गुरूप्रसाद राणे याचा मांडवी खाडीत बेतीजवळ मृतदेह आढळून आला. त्यामुळे कारवार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तो मृतदेह गुरूप्रसाद राणे याचाच असल्याचे निष्पन्न झाले. विनायक याच्या हत्याप्रकरणातील मुख्य संशयित गुरुप्रसाद यानेच जीवन संपवल्याने पोलिसांसमोर या प्रकरणाचे गूढ सोडविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

कारवारचे पोलिस अधीक्षक नारायण एम. म्हणाले की, विनायक नाईक यांचा खून करण्यामागे वैयक्तिक कारण, द्वेष असू शकतो. मात्र गुरुप्रसाद राणे यांचा मृत्यू झाल्याने सत्य बाहेर काढणे कठीण झाले आहे. मात्र, विनायक व गुरुनाथ यांचे कौटुंबीक संबधही होते. नाजूक संबंध किंवा आर्थिक व्यवहारातूनही विनायकची हत्या झाल्याची शक्यता असून याद़ृष्टीने तपास सुरू आहे.

कोण होता गुरुनाथ राणे?

विनायक नाईक या व्यावसायिकाच्या खुनातील मुख्य संशयित गुरुप्रसाद राणे हा मूळचा कारवार येथील होता. सध्या तो खडपाबांध-फोंडा येथे राहत होता. गोव्यातील मडकई आणि शिरोडा येथे त्याच्या दारूच्या कंपन्या आहेत. त्यामुळे एका व्यावसायिकाने दुसर्‍या व्यावसायिकाचा खून करून स्वत: जीवन का संपवले, याचे उत्तर अद्यापही पोलिसांना मिळालेले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT