पुण्यातील पाषाण परिसर... सकाळचे साडे नऊ वाजले होते. पोलिस नियंत्रणक कक्षाला एक तरुणी फौन करून माहिती देते, आई घराचा दरवाजा उघडत नाही. चतुःश्रृंगी पोलिस घटनास्थळी धाव घेतात. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर घरात कोणी मिळून येत नाही. तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा बंद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येते. दरवाजा उघडताच गळ्यात कुत्र्याचा बेल्ट, तोंडातून रक्तस्राव, फरशी रक्ताने माखलेली अशा अवस्थेत निपचित पडलेला तरुणीच्या आईचा मृतदेह दिसून येतो...
गीता पेशाने आयटी अभियंता. नुकतेच वडिलांचे निधन झाले होते. आपल्या ५८ वर्षीय आईसोबत ती राहत होती. डेटिंग ॲपच्या माध्यमातून सात महिन्यांपूर्वी तिचा निरज मिश्रा नावाच्या तरुणासोबत परिचय झाला होता. निरज मूळचा आग्र्याचा. नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता. डिलीव्हरी बॉय म्हणून तो नोकरी करत होता. एक दोन भेटीतच दोघांमध्ये प्रेमाचा मळा फुलला. निरज खूनशी वृत्तीचा होता. काही दिवसानंतर त्यांच्यात खटके उडू लागले. गीताने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडून टाकले. परंतु तो काही केल्याने गीताचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. त्याने गीता काम करत असलेल्या कंपनीत मेल करून तिची बदनामी केली. त्यामुळे तिला आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. गीताच्या आईला सुद्धा निरज चांगला वाटत नव्हता. माझ्या मुलीसोबत संबंध ठेवू नकोस आणि परत आमच्या घरी येऊ नकोस, असे निरजला त्यांनी सुनावले होते. तेव्हापासून गीताची आई निरजच्या डोक्यात बसली होती.
शेवटचे भेटायचे असल्याचे सांगून १७ जानेवारी रोजी निरज बाणेर येथे गीताला भेटला. यावेळी देखील तिने निरजला माझ्यासून दूर राहा, असे सांगितले. हाताला जखमा करून घेत तो आत्महत्या करणार असल्याचे सांगून गीताला धमकावत होता. निरजच्या डोक्यातून काही केल्याने गीता जात नव्हती; तर आई विरोध करत असल्यामुळे तो तिच्यावर चिडून होता.
दुसऱ्या दिवशी १८ जानेवारी रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास निरज गीताच्या घरी गेला; परंतु गीता आपल्या मित्राच्या घरी गेली होती. यावेळी तिची आई एकटीच घरी होती. रागात त्याने कुत्र्याच्या बेल्टने गळा आवळून तिच्या आईचा खून केला. त्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी शांत डोक्याने नियोजन करण्यास सुरुवात केली. त्याने मृतदेह बाथरूमध्ये नेऊन टाकला. वाथरुमध्ये पडून मृत्यू झाला असे निरजला भासवायचे होते. दोऱ्याचा वापर करून त्याने सुरुवातीला बाथरूमचा आणि त्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला. गीताच्या आईचा मोबाईल घेऊन तो फरार झाला होता.
सकाळी गीता घरी परतली. तिने दरवाजा वाजविला. परंतु आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तिने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली. चतुः श्रृंगी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. हॉल, बेडरुमध्ये गीताची आई मिळून आली नाही. शोधत असताना, पोलिसांना बाथरूमचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी चावी तयार करणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने दरवाजा उघडला. त्यावेळी गीताची आई निपचित पडलेली दिसून आली. आईच्या गळ्याला कुत्र्याचा बेल्ट होता. तोंडातून रक्तस्राव झालेला होता. तसेच फरशी वर रक्त सांडलेले होते.
गीताच्या आईचा खून झालेला होता. पोलिसांना आता मारेकऱ्यापर्यंत पोहोचायचे होते. गीताकडून निरजबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. परंतु त्याने आपण काहीच केले नसल्याचे सांगितले. मी घरी गेलो होतो, परंतु लगेच परत फिरलो असे सांगितले. पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला होता. त्याच्या कृत्याचा लेखा-जोखा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. रात्री १२ वाजून ३ मिनिटांनी निरज सोसायटीत जीन्याने वरती जाताना दिसला होता. पावणे एक वाजताच्या सुमारास खाली येताना दिसला होता. त्याने आपण गीताच्या आईचा खून केला नाही, असे सांगितले; मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही दाखवताच त्याच्या पायाखालील जमीन सरकली आणि त्याने पोलिसांपुढे आपल्या पाढा वाचला.