Murder Mystery | प्रेमाचा करुण अंत की पैशांची हाव? प्रेयसी आणि तिच्या मुलाच्या मृत्यूची अंगावर काटा आणणारी कहाणी 
क्राईम डायरी

Murder Mystery | प्रेमाचा करुण अंत की पैशांची हाव? प्रेयसी आणि तिच्या मुलाच्या मृत्यूची अंगावर काटा आणणारी कहाणी

पुणे जिल्ह्यात गाजलेल्या खून प्रकरणाची तपासकथा

पुढारी वृत्तसेवा

अशोक मोराळे, पुणे

तो अतिशय खतरनाक होता... खून केल्यानंतर पुरावादेखील मागे सोडायचा नाही. एकेदिवशी तर त्याने क्रौर्याची परिसीमाच गाठली. प्रेयसीच्या मुलाचे अपहरण करून त्याचा खून केला. प्रेयसी आपल्या मुलाबाबत त्याच्याकडे विचारू लागली. तेव्हा त्याने तिलादेखील कायमची शांत केली. परंतु, दुसर्‍याच एका खुनात तो सापडला अन् पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. ही गोष्ट आहे, सराईत गुन्हेगार ललित दीपक खोल्लम याने रेखाटलेल्या रक्तचरित्राची.

18 मार्च रोजीचा तो दिवस. खेड तालुक्यातील जैदवाडी गावच्या शिवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मयताच्या डोक्यात, तोंडावर धारधार शस्त्राने वार करण्यात आले होते. एकाने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. एकाने सांगितले हा तर धनंजय घेवडे, राक्षेवाडीचा राहणारा. पोलिसांना आता खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली होती. परंतु, खुनी अद्याप मोकाट होता. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा करत होती.

नुकताच प्रमोद क्षीरसागर यांनी पदभार घेतला होता. कसलेले अधिकारी म्हणून क्षीरसागर यांची ओळख. क्षीरसागर आणि त्यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली होती. खबर्‍यांना अलर्ट करण्यात आले, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी सुरू झाली. घटनास्थळ दुर्गम भागात असल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा तसा अभाव होता. त्याचवेळी एका कॅमेर्‍यात दोन संशयित व्यक्ती निदर्शनास आल्या. त्यांच्या हालचाली पाहून पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावला. अखेर पोलिसांचा तो संशय खरा ठरला. कारण ते दोघे दुसरे-तिसरे कोणी नसून सराईत गुन्हेगार ललित खोल्लम आणि त्याचा साथीदार नंदलाल होले होते.

क्षीरसागर आणि त्यांच्या पथकाने दीडशे किलोमीटरचा परिसर धुंडाळून 110 कॅमेरे पाहिले. सहा दिवस पोलिस दोघांच्या मागावर होते. पण, हे दोघे काही केल्याने हाती लागत नव्हते. तेवढ्यात एका खबर्‍याने टीप दिली, साहेब दोघे संशयित गुन्हेगार वडगाव निंबाळकर परिसरात आहेत. स्थानिक पोलिसांच्या मदतीने एका उसाच्या शेतातून दोघांना पळून जाण्याच्या तयारीत असताना क्षीरसागर आणि त्यांच्या पथकाने पकडले. धनंजय आणि नंदलाल या दोघांमध्ये वाद होते. त्या कारणातून ललित आणि नंदलाल या दोघांनी मिळून लोखंडी रॉड आणि डोक्यात दगड घालून धनंजयचा काटा काढला. दोघांनी त्याचा खून केल्यानंतर आपल्या अंगावरील रक्ताचे डाग पडलेले कपडे जाळून टाकले. तर त्याचा मोबाईल विहिरीत टाकून दिला होता. ललित रेकॉर्डवरील बडा गुन्हेगार, आतापर्यंत त्याच्यावर सातारा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात तब्बल 35 गुन्हे दाखल. त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश.

क्षीरसागर यांना ललितची एक गोष्ट खटकत होती. तो काहीतरी पोलिसांपासून लपवत होता. शेवटी क्षीरसागर यांनी त्याला बोलतं केलं; मात्र त्याने दिलेली माहिती ऐकून काही वेळ क्षीरसागरदेखील स्तब्ध झाले. त्याने केलेच होते तसे काही. शिरोली गावच्या रूपाली वाडेकर या महिलेसोबत ललितचे प्रेमसंबंध होते. रूपाली ललितकडे सतत पैसे मागायची. तिचा मुलगा श्रीकांत हा देखील ललितकडे पैसे मागायचा. त्याचा राग ललितच्या डोक्यात पिंगा घालत होता. एकेदिवशी (नोव्हेंबर 2025) त्याने प्रेयसीचा मुलगा श्रीकांत वाडेकर याला पैसे देतो, असे सांगून खेड येथे बोलावून घेतले. तेथून त्याचे अपहरण करून त्याला शिरोली येथील फ्लॅटवर घेऊन आला. तेथे डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून केला. यानंतर पोलिसांना पुरावा हाती लागू नये म्हणून साथीदार नंदलाल याच्या मदतीने मंचर परिसरात श्रीकांत याचा मृतदेह जाळून टाकला. त्याची राख घोडनदीपात्रात टाकून दिली.

इकडे मुलगा बेपत्ता झाल्याने त्याची आई म्हणजेच ललितची प्रेयसी रूपाली त्याला विचारू लागली. त्यामुळे तिचादेखील आता ललितला राग आला होता. शांत डोक्याने योजना आखून त्याने रूपालीला 13 नोव्हेंबर रोजी शिरोलीतील फ्लॅटवर बोलावून घेतले, ती आली. दोघांत परत वाद झाला. त्यावेळी ललितने रूपालीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. घाव वर्मी लागल्याने ती अर्धमेली झाली. ललितने तिच्या गळ्यावर चाकूने वार केला. दोन खून केल्यानंतरदेखील ललितला वाटत होते, दोन खून पचले आहेत. परंतु, त्याने धनंजय घेवडेचा खून केला अन् तपासात त्याने केलेल्या आणखी दोन खुनांचा छडा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT