सुनील कदम
भारतीय नारीला कुणी भलेही ‘अबला’ म्हणू देत; पण ज्यांनी कुणी तिचं ‘सामर्थ्य’ आजमावलंय तो उभ्या आयुष्यात नारीला अबला म्हणण्याची घोडचूक करणार नाही. एखाद्या महिलेवर अन्याय झाला आणि त्या अन्यायाविरुद्ध ती जर का पेटून उठली, तर भलेभलेच काय, पण लंकाधिपती रावण आणि कौरवांचीसुद्धा राखरांगोळी झालेले दाखले इतिहासाच्या पानापानांत दडलेले आहेत. अशाच एका पतिव्रतेच्या भडकलेल्या सुडाग्नीत जगप्रसिद्ध अब्जाधीश डोसाकिंग पी. राजगोपाल अक्षरश: जळून खाक झाला. त्या भडकलेल्या सुडाग्नीची आणि डोसाकिंगच्या पतनाची ही आहे कर्मकहाणी...
‘ती’ एक असाहाय्य नारी होती, घरच्यांचा विरोध पत्करून तिने प्रेमविवाह केला होता आणि आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती. अशाच एका अडचणीच्यावेळी काहीतरी मदत मिळेल म्हणून ती डोसाकिंग पी. राजगोपालकडे आली होती. पण, तिला पाहताच पी. राजगोपालची अवस्था ‘ती पाहताच बाला, कलिजा खल्लास झाला’ अशी झाली. त्याच्या मनात तिच्याविषयी वासनेचे थैमान सुरू झाले. या वासनेच्या अभिलाषेपोटीच त्याने तिला मदत केली आणि बदल्यात तिला ‘वश’ करण्याचे प्रयत्न सुरू केले. पण, ती आपल्या जाळ्यात अडकत नाही हे बघितल्यावर राजगोपालने तिच्या नवर्याचा खून करून तिच्या सुखी संसाराचा सारीपाटच उधळून लावला आणि वरवर अबला वाटणार्या तिच्या मनात सुडाची ज्वाला भडकली. अखंड वीस वर्षे अक्षरश: एकाकी संघर्ष करून तिने अखेर न्याय मिळवलाच. नुसता न्यायच नव्हे तर या जगप्रसिद्ध डोसाकिंगला अक्षरश: मातीत गाडून टाकले.
तामिळनाडूच्या तुतिकोरीन जिल्ह्यातील पुन्नाइयादी या छोट्याशा खेडेगावात 1947 साली पी. राजगोपालचा जन्म झाला. त्याचे कुटुंब अत्यंत गरीब आणि अशिक्षित होते, त्यामुळे पी. राजगोपालच्या जन्माची नेमकी तारीखसुद्धा कुठे नोंदविण्यात आलेली नाही. पी. राजगोपालचा बाप एक छोटा कांदा उत्पादक शेतकरी होता. पण, पी. राजगोपालचे मन शेतीत कधीच रमले नाही. त्यामुळे काहीतरी वेगळा उद्योग व्यवसाय करण्याच्या हेतूने 1973 साली पी. राजगोपाल चेन्नईत आला आणि तेथील केकेनगरमध्ये त्याने एक किराणा दुकान चालू केले. मात्र, या धंद्यात त्याला फारशी काही मिळकत होत नव्हती. अशातच एकेदिवशी एक ज्योतिषी पी. राजगोपालच्या दुकानात आला आणि त्याने त्याला सल्ला दिला की, ‘तू जर हॉटेल चालू केलेस तर चांगलीच बरकत होईल’.
पी. राजगोपालने ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार ‘सर्वना भवन’ या नावाने हॉटेल चालू केले. आपल्या हॉटेलमध्ये त्याने अत्यंत दर्जेदार मसाले आणि तेल वापरून तयार केलेले इडली, वडा, समोसा, डोसा आदी पदार्थ करायला सुरुवात केली. मालाच्या दर्जाच्या, शुद्धतेच्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत पी. राजगोपाल कोणतीही तडजोड करीत नव्हता. त्यामुळे अल्पावधीतच त्याच्या हॉटेलचे नाव संपूर्ण चेन्नईत प्रसिद्ध झाले. खास करून त्याच्या हॉटेलमधील डोसा खाण्यासाठी खवय्यांची झुंबड उडू लागली.
शेवटी ग्राहकांच्या मागणीनुसार त्याला चेन्नई शहराच्या वेगवेगळ्या भागांत सर्वना भवन हॉटेलच्या शाखा सुरू कराव्या लागल्या. केवळ चेन्नई शहरच नव्हे तर संपूर्ण दक्षिण भारतात पी. राजगोपालच्या सर्वना भवनचा आणि त्याच्या डोशाचा गवगवा झाला. लोक पी. राजगोपालला ‘डोसाकिंग’ म्हणूनच ओळखू लागले. हळूहळू पी. राजगोपालच्या सर्वना भवनने राज्याच्या सीमा ओलांडून देशभर आणि अल्पावधीतच जगभर हातपाय पसरले.
आज जगातील सिंगापूर, मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, सौदी अरेबिया, ओमान, कतार, बहरीन, कुवेत, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, स्विडन, कॅनडा, आयर्लंड, लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इटली आणि रोम आदी 23 देशांमध्ये ‘सर्वना भवन’च्या शाखा आहेत. दरवर्षी काही हजार कोटींची उलाढाल आणि त्याच पटीत कमाईही आहे. संपूर्ण जगभरात आज पी. राजगोपालला डोसाकिंग म्हणूनच ओळखले जाते. दरम्यानच्या कालावधीत पी. राजगोपालची दोन लग्ने झाली. त्याला दोन मुलेही झाली. पण, ही लग्ने यशस्वी ठरली नाहीत.
काही कालावधीतच त्याच्या दोन्ही पत्नी त्याच्यापासून विभक्त झाल्या. ज्या ज्योतिषाने पी. राजगोपालला हॉटेल व्यवसाय चालू करण्यास सांगितले होते. त्याच ज्योतिषाने त्याला तिसरे लग्न केल्यास आणखी भरभराट होण्याचाही सल्ला दिला होता. त्यामुळे ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार तो तिसर्या लग्नाच्या खटपटीत होता.
पी. राजगोपालच्या ‘सर्वना भवनचा’ जगव्याप्त कारभार सांभाळण्यासाठी हजारो कामगार नेमण्यात आले होते. त्यापैकी असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर काम करणार्या एका कर्मचार्याला ‘जीवज्योती’ नावाची मुलगी होती. तिने आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन 1999 साली ‘प्रिन्स संतकुमार’ याच्याशी प्रेमविवाह केला होता. ज्योती आणि संतकुमारने आपल्या संसारासाठी ट्रॅव्हल्सचा एक छोटासा धंदा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भांडवलाची अडचण होती.
पी. राजगोपाल अडल्या-नडलेल्यांना मदत करतो, असे ज्योतीच्या ऐकण्यात होते. त्यामुळे तिने पी. राजगोपालकडून काहीतरी मदत मिळविण्याच्या हेतूने त्याची भेट घेतली. त्यावेळी तिचे वय साधारणत: पी. राजगोपालची मुलगी शोभावी एवढंच होते. मात्र, ज्योतीला बघताच पी. राजगोपालच्या मनात एकाचवेळी वासनेचे सैतान आणि तिसर्या लग्नाचा हेतू जागृत झाला. त्यामुळे तिने मदत मागताच त्याने काहीही करून तिला वश करण्याच्या हेतूने तिला आर्थिक मदत केली. पण, त्याचा हा दुष्ट हेतू काही जीवज्योतीच्या लक्षातही आला नाही. (पूर्वार्ध)