डोंबिवली : मुंब्र्यापासून कल्याणपर्यंत पसरलेली खाडी आपल्या बापजाद्यांची प्रॉपर्टी असल्याप्रमाणे रेतिमाफियांना गिळंकृत करायला घेतली आहे. वारंवार कारवाया करूनही खाडीतील रेती उपसा थांबत नसल्याचे पाहून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत कौशल्याने रेती माफियांच्या बोटींसह सक्शन पंप जाळून नष्ट करण्याची मोहीम सुरू केली आहे. सोमवारी (दि.10) सकाळीच महसूल, सागरी महामंडळ, वन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी मुंब्रा, दिवा, कोपर, पश्चिम डोंबिवलीतील जुनी डोंबिवली, मोठागावच्या खाडी किनारी उभ्या असलेल्या रेती माफियांच्या उत्खनन बोटींसह सक्शन पंप जाळून टाकले.
कल्याणच्या महसूल विभागाने गेल्या आठवड्यात रेती उत्खनन करण्यासाठी लागणारी माफियांची 10 लाखांची साधन/सामग्री जाळून नष्ट केली होती. सोमवारच्या कारवाईत तब्बल 25 लाखांची सामग्री जाळून नष्ट करण्यात आली आहे. रेती माफिया रात्रीच्या सुमारास खोल खाडीत जाऊन रेतीचा उपसा करतात. सकाळच्या सुमारास उपसा करण्यासाठी लागणाऱ्या बोटी खाडी किनारी खारफुटी, खाडीचे डोह यांच्या आडोशाने उभ्या करून निघून जात असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. रात्रीच्या सुमारास रेती उपसा करताना बोटीतून जाऊन माफियांवर कारवाई केल्यास पथकांवर त्यांच्याकडून प्रतिहल्ला होण्याची भीती असते. यापूर्वी असे प्रकार घडले असल्याने महसूल अधिकाऱ्यांनी सावध पावित्रा घेतला आहे.
सोमवारी (दि.10) सकाळी सहा वाजता उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर आणि तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार नितीन बोडके, डोंबिवलीचे मंडल अधिकारी रविंद्र जमदरे, ग्राम महसूल अधिकारी अरुण कासार, अश्विनी थोरात, वैभव झापडे, हनुमंत जाधव, भारती शेटे, वन विभागाचे वनपाल पी. बी. माळी, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे अधिकारी के. आर. देशमुख, विष्णूनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अचानक डोंबिवलीतील मोठागावपासून कोपर, दिवा, मुंब्र्या दरम्यान धाडी टाकल्या. कारवाई दरम्यान रेती माफियांनी खाडी किनारी खारफुटी, खाडीचे डोह भागात आडोशाने उभ्या केलेल्या रेती उपशाच्या बोटी, उत्खनन करण्यासाठी लागणारे पंप आणि पाडाव शोधून ही सर्व साधन सामुग्री जाळून नष्ट केली.
या सामग्रीचा रेती माफियांना पुन्हा वापर करता येऊ नये अशा पध्दतीने महसूल अधिकाऱ्यांनी जाळून टाकली. त्यासाठी मीठ आणि ज्वलनशील इतर घटकांचा वापर करण्यात आला. या कारवाईत माफियांची जवळपास 25 लाखांची साधन सामग्री नष्ट केली असून अशाच पद्धतीने कारवाई यापुढे नियमित सुरू राहणार.सचिन शेजाळ, तहसीलदार
महसूल विभागाने पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात डोंबिवली ते मुंब्रा खाडीतील रेतीमाफियांवर केलेल्या कारवाईचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे. अशीच कारवाई पश्चिम डोंबिवलीतील कुंभारखाणपाड्यापासून कल्याण व्हाया गणेशनगर खाडी पट्ट्यात करावी. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांंनी या पट्ट्यात पहाटेच्या सुमारास छापा मारून रेती माफियांवर कारवाई करावी, अशी मागणी निसर्गप्रेमी पर्यावरणवाद्यांकड़ून पुढे आली आहे.