डोंबिवली (ठाणे): तुमचे क्रेडिट कार्ड बंद होणार आहे. बंद होण्यापूर्वी आपणास त्याचे शुल्क भरणा करावे लागेल, अशी भीती दाखवून दोघा भामट्यांनी कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरातील श्रीनिवास वसाहतीत राहणाऱ्या नोकरदाराची १२ लाख ६६ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. सप्टेंबर ते ऑक्टबर २०२४ या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या संदर्भात तक्रारदार उशिरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल होण्यास उशिर झाला आहे.
या संदर्भात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार हे मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात असलेल्या एका कार्यालयात नोकरी करतात. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संबंधित तक्रारदाराला कार्यालयात आणि कल्याणच्या खडेगोळवलीतील श्रीनिवास वसाहतीमधील आपल्या घरी असताना नेहा शर्मा आणि सिताराम सहाणी यांनी वेळोवेळी संपर्क साधला.
तुमचे क्रेडिट कार्ड लवकरच बंद होणार आहे. हे कार्ड बंद होण्यापूर्वीच तुम्ही त्याचे शुल्क भरणा करा, असे नेहा आणि सिताराम यांनी सांगितले. यावर विश्वास ठेऊन तक्रारदाराने क्रेडिट बंद होण्याची प्रक्रिया आणि त्यावर भरावे लागणारे शुल्क याविषयीची माहिती दोन्ही भामट्यांकडून जाणून घेतली. तक्रारदाराचा त्या दोन्ही भामट्यांनी विश्वास संपादन केला. वेळोवेळी तक्रारदाराशी संपर्क साधून त्यांच्याकडून शुल्क भरण्यासह कागदपत्र आणि इतर आर्थिक प्रक्रिया करण्यास भाग पाडले.
कार्यालयीन विविध प्रक्रियेची कारणे देऊन नेहा शर्मा आणि सतिश सहाणी या दोघा भामट्यांनी तक्रारदाराकडून आर्थिक व्यवहारासाठी त्यांचा पासवर्ड घेतला. तक्रारदाराची कागदपत्रे घेऊन दोन्ही भामट्यांनी तक्रारादाराच्या नावे १२ लाख ६६ हजाराचे बँक कर्ज मंजूर करवून घेतले. ही रक्कम तक्रारदाराला समजून न देता दोन्ही भामट्यांनी ही रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळती केली.
हा सारा प्रकार तक्रारदाराच्या उशिरा लक्षात आला. क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नावाखाली आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदाराने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. एम. पाटील या प्रकरणाचा चौकस तपास करत आहेत.
दर महिन्याला कल्याण-डोंबिवली परिसरात अदमासे चार ते पाच नागरिकांची वाढीव परताव्याचे आमिष दाखवून भामटे फसवणूक करत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यातच क्रेडिट कार्ड बंद झाल्याची थाप मारून दोघा बदमाशांनी तब्बल १२ लाख ६६ हजार रूपये लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकीकडे पोलिस त्या दोन्ही भामट्यांपर्यंत कसे पोहोचतात ? याकडे फसगत झालेल्या तक्रारदाराचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे क्रेडिट कार्ड/बँक खाते खाते बंद झाले आहे, गुंतवणूक केल्यास वाढीव परतावा/नफा मिळेल, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास गलेलठ्ठ रक्कम मिळेल, अशी अमिषे दाखविणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, त्यामुळे फसगत होण्याची दाट शक्यता असते, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.