डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यातील गुंड-गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी दस्तुरखुद्द पोलिस उपायुक्त अतुल झेंडे स्वत: रात्रीच्या सुमारास रस्त्यावर उतरले आहेत. चरस, गांजा, अफू अफिम, गर्दा, एमडी सारख्या अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या नशेडींवर कारवाईची झोड घेतली जात आहे. त्याचबरोबर उपायुक्त झेंडे यांनी दारूचे गुत्ते शोधून तेथे विक्री करणाऱ्यांसह मद्यपान करणाऱ्या दोघांची जागीच गठडी वळून कान चेक तर केलेच, शिवाय खाकीचा दणका देऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली आहे.
पोलिसांच्या दबंगगिरीची भरली बदमाशांच्या उरात धडकी
कल्याणच्या खडेगोळवलीतील नशेडींचे कान टोचले
मद्यपी-चरसी-गांजाडू-व्यसनींविरोधात डीसीपींची आक्रमक मोहीम
कल्याण पूर्वेत बुधवारी (दि.25) रात्री गांजा सेवन करणाऱ्या दहा जणांना कोळसेवाडी पोलिसांनी पकडले होते. कान चेक करून त्यांना 100 उठा-बशा काढण्याची शिक्षा केल्यानंतर सोडण्यात आले. पुन्हा उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी कुठेही अंमली पदार्थ सेवन करताना आढळले तर थेट अटकेची कारवाई करण्यात येईल, अशी तंबी या नशेडींना देण्यात आली. गुरूवारी (दि.26) रात्री कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली भागात 8 नशेडींना उघड्यावर गांजा फुंकताना पकडण्यात आले. या बदमाशांची उपायुक्त अतुल झेंडे यांनी हजेरी घेऊन झिंग उतरवली.
उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे स्थानिक पोलिस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचारी देखिल कार्यरत झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा आक्रमक दणका कल्याण-डोंबिवलीतील नशेडींना बसला नव्हता. त्यामुळेच नशेडींच्या संख्येत अमुलाग्र वाढ होत चालली आहे. ओठांवर मीसूरडे न फुटलेली अल्पवयीन मुले नशेच्या आहारी गेल्याने त्यांना या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी पालक या नात्याने उपायुक्त अतुल झेंडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
उपायुक्तांच्या आक्रमक कारवायांमुळे रात्री नऊ वाजल्यापासून ते पहाटे चार वाजेपर्यंत कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या नशेडींमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागात एका निर्जन ठिकाणी 8 टवाळखोर अंमली पदार्थांसह दारू ढोसत बसल्याची माहिती उपायुक्त झेंडे यांना मिळाली होती. या आठही नशेडींना पकडून पोलिसांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात हजर केले.
अमली पदार्थ सेवकर करणाऱ्या सर्वांची कानउघाडणी करत खाकी वर्दीचा दणका दाखवलाच, शिवाय त्यांना 100 उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. उठाबशा काढताना अनेक जण कण्हत-कुंथत होते. हा प्रकार पाहणाऱ्या बघ्यांनी मज्जा घेतली. मात्र उपायुक्तांच्या दणक्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. उपायुक्तांनी एकदा पश्चिम डोंबिवलीच्या खाडी किनारपट्ट्यात फेरफटका मारण्याची मागणी डोंबिवलीकर करत आहेत. नवीन वर्षानिमित्त सार्वजनिक ठिकाणी, रस्तोरस्ती मद्यपी, टवाळखोर, गांजाडू गर्दुल्ल्यांकडून सर्वसामान्यांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन, तसेच कल्याण-डोंबिवली परिसरातील वाढती गुन्हेगारी लक्षात उपायुक्त अतुल झेंडे यांनी बदमाशांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे.
कल्याण परिसरातील वाढलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटना विचारात घेऊन कल्याण-डोंबिवलीतील आठही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकही मद्यपी, टवाळखोर, गर्दुल्ला, नशेखोर रस्त्यावर दिसणार नाही. कल्याण-डोंबिवलीकरांना त्यांचा त्रास होणार नाही. त्यांचे अड्डे कुठेही दिसता कामा नयेत. असे कुणी सापडले तर त्यांना जागच्या जागी पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.अतुल झेंडे, पोलिस उपायुक्त, ठाणे