मिरा रोड : मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नयानगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराच्या मूळ गावी लातूर जिल्ह्यात शेतामध्ये ड्रग्स बनवण्याचा कारखाना उभारला गेल्याचे तपासात समोर आले आहे.
महसूल गुप्तचर संचनालयाच्या पथकाने त्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 11.36 किलो मेफेड्रोन आणि प्रयोगशाळेतील उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान पोलिसांनी कारखान्यात काम करणार्या तिघांना व मिरारोड व मुंबई परिसरात ड्रग्स पुरवठा करून विक्री करणार्या व्यक्तीला हटकेश येथून मंगळवार (दि.8) रोजी ताब्यात घेतले.
या कारवाईत मुंबई येथील महसूल गुप्तचर संचलनालयाने पुणे येथील प्रादेशिक युनिट्सच्या मदतीने लातूर जिल्ह्यात ड्रग्स बनवण्यात येत असलेल्या कारखान्यातील मुद्देमाल जप्त करत शेतात पत्राशेडमध्ये सुरू असलेला बेकायदा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.
देशासह राज्यात अंमली पदार्थ, ड्रग्स, गुटखा तस्करीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या अमली पदार्थांच्या आहारी गेल्याने तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. शासन हे अमली पदार्थांच्या तस्करी बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई येथील महसूल गुप्तचर संचलनालय यांना लातूर जिल्ह्यात चाकुर तालुक्यातील रोहिणा गावातील एका शेतात ड्रग्स बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. मुंबई महसूल गुप्तचर संचालनालय यांनी पुणे येथील त्यांच्या प्रादेशिक युनिट्सच्या मदतीने या ठिकाणी सुरू असलेल्या कारखान्यात छापा टाकला. त्यावेळी शेतात पत्राशेडमध्ये ड्रग्स बनवण्याचा सुरू असलेला बेकायदा कारखाना आढळून आला. नयानगर पोलीस ठाण्यातील हवालदार हे आपल्या मूळ गावी काही दिवसांपासून वैद्यकीय रजेवर होते. त्यांना ताब्यात घेत महसूल गुप्तचर संचालनालयाने कारवाई केली आहे. या कारवाईत आतापर्यंत एका पोलीस कॉन्स्टेबलसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 17 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
कारवाई केल्यानंतर पोलीस हे लातूरकडे परत येत असताना संशयित आरोपीने ड्रायव्हरला मारहाण करत कारचे स्टेअरिंग फिरवून गाडीचा अपघात करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडी हॉटेल समोरील दुचाकीवर जाऊन आदळली व त्यात दुचाकीचे नुकसान झाले. घटनेत महसूल गुप्तचर संचलनालयाच्या अधिकार्यांना किरकोळ जखमा झाल्या. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडला. आरोपी विरोधात चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बी. चंद्रकांथ रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभागीय कार्यालय चाकूर यांनी दिली आहे.