डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील सोसायट्यांमध्ये घुसून दोघा सशस्त्र चोरट्यांनी एकच वेळी लागोपाठ तीन घरे साफ केले. Pudhari News Network
क्राईम डायरी

Thane Crime News | डोंबिवलीत कोयताधारी चोरट्यांची दहशत

भरदिवसा लागोपाठ 3 बंद घरे साफ; 2.41 लाखांचा ऐवज लंपास : सशस्त्र चोरटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील सोसायट्यांमध्ये घुसून दोघा सशस्त्र चोरट्यांनी एकच वेळी लागोपाठ तीन घरे साफ केल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे हे दोन्ही चोरटे घरातील तसेच घराबाहेर लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास चक्रांना वेग दिला आहे. तर दुसरीकडे चोरटे सशस्त्र असल्याचे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात आढळून आल्याने रहिवाशांची भीतीने पाचावर धारण बसली आहे.

या संदर्भात एका घटनेत सुदामा नगरमध्ये असलेल्या मॉडेल कॉलेज बस स्टॉप जवळच्या आर एच ८२ प्लॉटवरील सिमेन्स सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे रोहित जयराम गुप्ता (३६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे मॉडेल कॉलेज बस स्टॉप जवळ आलेल्या आर एच २९ प्लॉट वरील साईदीप सोसायटीच्या ए आणि बी विंगमधील दोन बंद फ्लॅटमध्ये घुसून चोरट्यांनी तेथील ऐवज लंपास केला. शुक्रवारी दुपारी ते ३.४५ दरम्यान भरदिवसा घरे फोडल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या छब्या घरातील तसेच घराबाहेर लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. यातील एका चोरट्याचा हातात कोयता असल्याने रहिवाशांत घबराट पसरली आहे. या दोन चोरट्यांनी ए विंग मधील पहिल्या मजल्यावर असलेला ७ क्रमांकाचे घर फोडले. कडी-कोयंडा उचकटून घरात घुसलेल्या चोरट्यांनी मौल्यवान दागिने व रोकड चोरून नेली. अशाच पद्धतीने बी विंगमधील १० क्रमांकाचे घर फोडून चोरट्यांनी तेथील कपाट उचकटले. मात्र मात्र हाती काहीच न लागल्याने चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त टाकून पळ काढला. तर रोहित गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि काही रोकड असा मिळून २ लाख ४१ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा सारा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजण्याच्या कालावधीत घडला आहे. रात्री उशिरा घरी परतलेल्या रोहित गुप्ता यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडला दिसला. दरवाज्याचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. तर बेडरूम मधील कपाटाचा दरवाजा उचकटलेल्या अवस्थेत, तसेच त्यातील सामानही असताव्यस्त आढळून आले.

दरवाजाजवळ पाळत ठेवणाऱ्या चोरट्याच्या हातात कोयता आहे. यदाकदाचित जर का कुणी रहिवासी समोर आला तर त्याचा खात्मा करण्याच्या उद्देशाने हा चोरटा तयारीत असताना दिसत आहे.

समोर येईल त्याचा खात्मा

भर दिवसा बंद घरे फोडणारे दोन्ही चोरटे २२ ते २५ वयोगटातील असावेत. या दोन्ही चोरट्यांनी त्यांच्या चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचा मास्क लावलेला दिसून येत नाही. यातील एका चोरट्याच्या हातामध्ये धारदार कोयता दिसत आहे. हा चोरटा फोडलेल्या घराच्या दरवाजाच्या फटीतून बाहेरच्या हालचालींवर पाळत ठेवताना दिसत आहे. तर दुसरा चोरटा घराच्या अन्य खोलीत जाऊन त्याचा कार्यभाग साधत आहे. दरवाजाजवळ पाळत ठेवणाऱ्या चोरट्याच्या हातात कोयता आहे. यदाकदाचित जर का कुणी रहिवासी समोर आला तर त्याचा खात्मा करण्याच्या उद्देशाने हा चोरटा तयारीत असताना दिसत आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये सदर घरात चोरी करून हे चोरटे पसार होताना घरात तसेच घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. या तिन्ही घटनांसंदर्भात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे फौजदार गणेश भाबड आणि त्यांचे सहकारी चोरट्यांचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT