मिरा रोड (ठाणे) : मिरा-भाईंदर शहरात अमली पदार्थ विक्री करणार्या आरोपीची जामिनावर सुटका झाल्यानंतर आरोपीची फटाके वाजवत मिरवणूक काढली. जमावबंदीचे आदेश असताना जमावबंदी केली. याप्रकरणी आरोपीसह ईतर आरोपींना अटक करून त्यांच्यावर नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरा-भाईंदर शहरात अमली पदार्थ विक्री करणार्यानी धुडगूस घातला आहे. रस्त्या- रस्त्यांवर अमली पदार्थ विक्री केली जात आहे. पोलीस गुन्हे दाखल करत असले तरी कठोर कारवाई होत नसल्याने अमली पदार्थ विक्रेते, त्यांना पुरवठा करणारे हे घाबरत नाहीत. डान्सबार, हुक्का पार्लर, शाळा व महाविद्यालयीन परीसरात अमली पदार्थ विक्री केली जात आहे. नयानगर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा कामरान खान याच्यावर एनडीपी कायद्या अंतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत.
कामरान खान हा अमली पदार्थ विक्रीचा मोठा डीलर असल्याचे सांगितले जात आहे. काही महिन्यापासून कामरान खान हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात होता. 16 जुलै रोजी ठाणे सत्र न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे. त्यामुळे त्याची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. त्याची सुटका झाल्यानंतर ठाणे करागृहाबाहेी त्याचे अमली पदार्थ विक्रीतील आरोपी यांनी जंगी स्वागत केले. त्यानंतर त्याची काशीमीरा ते मिरा रोड, नयानगर पर्यंत मिरवणूक काढली. मिरा रोड परिसरात फटाके वाजवले. त्यानंतर या सर्व प्रकारचा व्हिडिओ बनवून समाज माध्यमावर टाकण्यात आला. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
या व्हिडिओ मध्ये 16 जुलै रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर कामरान मोहोम्मद खान याचे त्याच गुन्हयातील त्याचे साथीदार व अगोदर पासुनच त्याच गुन्हयामध्ये जामीनावर असलेले आरोपी फहाद अब्दुल सय्यद, राशीद अस्लम शेख हे रेकॉर्डवरील गुन्हेगार कामरान याचे इतर समर्थक दिलावर पठाण, समिर युसुफ शेख, फरहान मोहोम्मद खान, अदनान मोहोम्मद खान, शरिफ, हैदर काटा, आसिफ यांच्यासह इतर अंदाजे 30 ते 35 अनोळखी समर्थक इसम यांच्यासह संगनमत करुन ठाणे कारागृह येथे जमा होवून कामरान मोहोम्मद खान याची सत्र न्यायालय, ठाणे यांनी जामिनावर मुक्तता केल्याने त्याच्या सेलीब्रेशनसाठी पाच वाहनांमधुन नयानगर येथे लोधा रोड मुझम्मल शेगडी हॉटेल जवळ विना परवाना एकत्र येवून त्या सेलीब्रेशनची व्हिडीओ क्लीप बनवुन ती व्हायरल केली.
पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), मिरा भाईंदर, वसई विरार यांनी दिलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन, गैरकायद्याची मंडळी जमा करून, लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले. याची नयानगर पोलीसांना माहिती मिळताच पोलीसांनी आरोपींना पकडुन नयानगर परीसरात त्यांची वरात काढत पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे विविध कलमासह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम विविध कलमा अंतर्गत नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना अटक करण्यात आली आहे.