डोंबिवली (ठाणे) : कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत धंदे बंद करण्यासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. शहराच्या विविध भागात पोलिसांची गस्ती पथके जुगार, मटके, दारू अड्डे, अंमली पदार्थ तस्करी अड्ड्यांवर कारवाई करत आहेत. मात्र डोंबिवली पूर्वेतील रामनगर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर, तसेच मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टाटा पाॅवर नाका भागात दिवसाढवळ्या जुगार-मटक्याचे तेजीत अड्डे चालविले जात आहेत. मात्र दुसरीकडे हातावर पोट भरणाऱ्यांचे घर, संसार उद्ध्वस्त होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
जुगार अड्डयांच्या माध्यमातून झटपट पैसा मिळत असल्याने अनेक नागरिक विशेषता कष्टकरी, मजूर वर्ग या अड्डयांवर सर्वाधिक येत असतो. अनेक वेळा या अड्ड्यांवर झटपट पैसा मिळण्या बरोबरच हातामधील सर्व पैसा या खेळातून निघून जातो आहे. जुगारी भिकेला लागत असल्याचे चित्र आहे. अनेक कुटुंब प्रमुख या अड्ड्यांवर पैशांची उधळण करतात. त्यामुळे अनेक कुटुंबाना त्याचे चटके बसत आहेत. अशी कुटुंबे हे अड्डे बंद करा म्हणून स्थानिक पातळीवर मागणी करत असतात, पण त्याची कुणीही दखल घेत नाही.
डोंबिवली पूर्वेत रामनगर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर रेल्वे स्थानकासमोरील एक इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर पडदे लावून दिवसाढवळ्या मटक्याचा अड्डा चालविला जात आहे. अनेक रिक्षावाले चालक, कष्टकरी, फेरीवाले, मजूर या अड्डयांमुळे व्यसनाधीन झाले आहेत. ही मंडळी या अड्ड्यांवर सकाळीच येऊन मटका, जुगार खेळत असतात. रेल्वे स्थानक भागातील वर्दळीच्या रस्त्यावर पोलिस ठाण्यापासून जवळ हा अड्डा सुरू असताना स्थानिक पोलिस या अड्ड्यापासून अनभिज्ञ कसे? असा सवाल जागरूक डोंबिवलीकर उपस्थित करत आहेत. या भागातील दुकानदार, रिक्षाचालक, भाजीवाले, फेरीवाले या सर्वांना हा अड्डा माहिती आहे. या अड्ड्यावर झटपट पैसा मिळेल या आशेने मटका अड्डयावर अनेकांच्या उड्या पडलेल्या असतात.
काही रिक्षावालेही प्रवासी वाहतुकीतून मिळणारे भाडे कुटुंबीयांचा विचार न करता या मटका अड्ड्यावर उधळत असल्याची माहिती आहे. असे अड्डे शहरात दिसता कामा नयेत, असे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांचे आदेश आहेत. स्थानिक पोलिस अशा अड्ड्यांवर कारवाई करत नसल्याने उपायुक्तांनी हा अड्डा उध्वस्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्रस्त रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टाटा नाका या वर्दळीच्या भागात मटक्याचा अड्डा बिनबोभाट सुरू आहे. एमआयडीसीतील मजुरांसह इमारत उभारणीच्या कामातील मजूर, काही पादचारी या अड्ड्यावर येऊन मटका खेळत असल्याचे दिसते. रस्त्यावर हातगाडी, शेगडी लावून वडा-पाव, पाणी-पुरी, भेळ-पुरी, वगैरे धंद्यांवर, तसेच रस्ता वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांवर पोलिस झटपट कारवाई करत आहेत. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या जुगार आणि मटका अड्डयांवर पोलिस का कारवाई करत नाहीत ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दोन्ही पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी मात्र आमच्या पोलीस ठाण्यात कोठेही अनधिकृत धंदे चालणार नाहीत याची काळजी घेतली जाते. प्राप्त तक्रारीप्रमाणे कारवाई केली जाते. असे अड्डे सुरू असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सांगितले. विषेश म्हणजे टाटा नाका भागातील मटका अड्डा एक महिला चालवित असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र अड्ड्याची मालकीण महिला असल्याने तिच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.