जगण्यासाठी पैसे गरजेचे आहेत; पण पैशाची लालसा नसावी. अशीच पैशाची लालसा ही एका दुहेरी हत्याकांडाला निमंत्रण देणारी ठरली. खरे तर हे हत्याकांड झाल्यावर 20-25 दिवस पोलिसही संभ्रमात होते; पण 25 दिवसांनंतर पोलिसांचा संशय बळावला आणि या हत्याकांडाचा उलगडा झाला, त्याची ही कहाणी...
ठाण्याच्या चितळसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मानपाडा येथील दोस्ती इम्पोरिया रेंटल या इमारतीच्या 14 व्या माळ्यावर राहणार्या समशेर सिंग (वय 65) आणि मीना सिंग (65) या दाम्पत्याचा एकाचवेळी संशयास्पदरीत्या राहत्या घरात मृत्यू झाल्याची घटना 5 जानेवारी, 2025 रोजी उघडकीस आली. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, ही आत्महत्या की हत्या? याबाबत चितळसर पोलिस संभ्रमात होते. तब्बल 25 दिवस पोलिस तपासचक्रे विविध पद्धतीने फिरवीत होते. मृतांच्या मुलालाही अंबरनाथ येथून बोलावून घेतले; मात्र मृत्यूबाबत खुलासा होऊ शकला नाही.
मृत मिना सिंग या घरातून दूध विक्रीचा व्यवसाय करीत होत्या, तर समशेर सिंग हे सुरक्षा रक्षकाचे काम करीत असल्याची माहिती समोर आली. घटनेच्या दिवशी सिंग या दाम्पत्याच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर दोन्ही मृतदेह हे संशयास्पद अवस्थेत आढळले. दरम्यान, मृतांच्या अंबरनाथ येथे राहणार्या सुधीर नामक मुलाने आणि पोलिसांनी चोरीच्या उद्देशाने किंवा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करीत मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आले; पण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर या दाम्पत्याची गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.
शवविच्छेदनाच्या अहवालाने पुन्हा एकदा चितळसर पोलिस ठाणे कामाला लागले. घटनेच्या दिवशी सोसायटीत कुणी आले-गेले याची पडताळणी करीत सीसीटीव्ही कॅमेर्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, सीसीटीव्हीमध्येही काहीच आढळले नाही. त्यामुळे पुन्हा पोलिस संभ्रमात पडले; पण हत्या करणारा हा याच इमारतीत राहत असल्याचा पोलिसांना संशय होता आणि त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला.
इतर घटनेत सीसीटीव्हीमुळे आरोपीची ओळख पटते; पण या प्रकरणात सीसीटीव्हीमुळे आरोपी हा त्याच इमारतीतील असल्याची पोलिसांना खात्री वाटू लागली. त्यामुळे नेमका खुनी कोण, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू झाला. त्यातच मृत दाम्पत्याचा सोन्याचा काही ऐवज लांबविल्याचे मृतांचा मुलगा सुधीर सिंग याने पोलिसांना सांगितले.
या सिंग दाम्पत्याच्या घरात कुणाचे येणे-जाणे असायचे किंवा इतर ठिकाणाहून या इमारतीत कोण यायचे, असा तपास सुरू झाला. सीसीटीव्ही तपासणीमध्ये याच इमारतीत राहणार्या निसार शेख (रा. रेंटल इमारत, 16 वा माळा) याचे येथेच राहणार्या रोहित उतेकर याच्याकडे येणे-जाणे होते, असे आढळून आले. रोहित उतेकर हा कळवा रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून कामाला होता. त्याला आणि निसार या दोघांना गांजा सेवन करण्याचे व्यसन होते. त्यामुळे दोघेही भेटत होते. पोलिस हवालदार अभिषेक सावंत यांना स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने निसार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याच इमारतीत राहणार्या रोहित उतेकर या वॉर्डबॉयचे नाव निसारने घेतले आणि खुनाचा उलगडा झाला.
निसार आणि रोहित या दोघांनाही नशेचे चोचले पुरविण्यासाठी पैशांची गरज होती. सिंग दाम्पत्याकडे चांगलीच माया असल्याचे रोहित याला माहिती होते. त्यामुळे निसार याला सोबत घेऊन रोहितने चोरीचा प्लॅन केला. सावधानता म्हणून रोहितने कळवा रुग्णालयातून हँडग्लोव्हज आणले. घटनेच्या दिवशी या दोघांनी 16 व्या माळ्यावरून 14 व्या माळ्यावरील सिंग यांच्या बाथरूमच्या खिडकीतून थेट सिंग यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी चोरी करताना झालेल्या आवाजामुळे सिंग दाम्पत्य हे जागे झाले. त्यांनी या दोघांना विरोध केला. त्यामुळे आपले पितळ उघडे पडेल, या भीतीमुळे दोघांनी मीना सिंग आणि समशेर सिंग यांचा गळा आवळून खून केला आणि सोन्याचा ऐवज घेऊन पसार झाले.
जाताना या दोघांनी दरवाजा मुद्दाम अर्धवट उघडा ठेवला. एका शेजार्याने दरवाजा उघडा पाहून आत डोकावले आणि सिंग दाम्पत्य निपचीत पडल्याचे बघून पोलिसांना कळविले. दोन्ही आरोपी रोहित आणि निसार हे गुन्हा उघड होईपर्यंत आणि इमारतीत लोकांची ये-जा होईपर्यंत घरातून बाहेर पडले नाहीत आणि लोकांची वर्दळ कमी झाल्यानंतर इमारतीच्या बाहेर पडले. आरोपींच्या हुशारीमुळे पोलिस तब्बल 15 दिवस संभ्रमात होते.
इमारतीच्या सीसीटीव्हीत आपण दिसलोच नाही तर पोलिसांचा तपास वेगळ्या दिशेने होईल आणि दोन्ही खून पचतील हा त्यांचा भ्रम जास्त दिवस टिकला नाही अन् इमारतीत कुणीच आलेले नसताना झालेल्या हत्येमुळे इमारतीतील कुणी तरी अज्ञाताने डाव साधल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. चोरी करणार्यानेच हत्या केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी इमारतीत राहणार्या निसार आणि रोहित या गांजाडूंवर संशय व्यक्त करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरीला विरोध झाल्याने सिंग दाम्पत्याची हत्या केल्याचेही कबुली दिली.