डोंबिवली (ठाणे) : घरातला कचरा कुंडीत टाकून परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबविणाऱ्या लुटारूला कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच कौशल्याने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. प्रितम रमेश जाधव (३१, रा. मिलींद नगर, एफ केबीन, कल्याण-पूर्व) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली आहे.
कल्याण पूर्वेकडील गणेशवाडीत राहणाऱ्या ईला बरून घोष (४८) या सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरातील कचरा गोळा करून तो जवळच असलेल्या कुंडीत टाकण्यास गेल्या. तेथून घरी परतत असताना पाळतीवर असलेल्या भुरट्या चोराने ईला यांच्या गळ्यातील चेन हिसकावून रेल्वे ट्रॅकच्या दिशेने पळ काढला. अचानक घडलेल्या प्रकाराने ही गृहिणी प्रचंड घाबरली होती. तरीही तिने चोर चोर आवाज देत चोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तथापी चपळ चोरट्याने वेगात धूम ठोकली.
ईला घोष यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे, पोनि साबाजी नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप भालेराव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळाचे सीसीटिव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे ईला घोष यांच्या गळ्यातील चेन हिसकावून पसार झालेल्या प्रितम जाधव याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून ईला घोष यांची ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीने यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का? याचा चौकस तपास पोलिस करत आहेत.