खानिवडे : मिरा- भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने गेल्या 11 महिन्यांत 32 प्रकरणांमध्ये 40 किलो ड्रग्ज जप्त केले असून 11 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणांत आतापर्यंत 62 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील अनेक आरोपी गुजरात, मध्यप्रदेश आणि बिहार येथील रहिवाशी आहेत.
आकडेवारीनुसार आयुक्तालयाचा परिसर मादक पदार्थांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येते. हे दाखल असलेल्या प्रकारणांवरील आकडेवारी असून दाखल होणार्या केसेसच्या तुलनेत दाखल न होणारी प्रकरणे किती असतील असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर आणि वसई विरार उपनगरांना ड्रग्ज साठवणूक व वितरणासाठी लक्ष्य केले जात असल्याची माहिती आहे. अँटी नॉर्कोटिक्स सेलच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्यापैकी बहुतांश आरोपी स्थानिक असून काही गुजरात, मध्यप्रदेश आणि बिहार येथून आले आहेत. नेपाळमार्गे बिहार आणि देशभर ड्रग्जचे वितरण केले जात आहे.
दरम्यान मिरा-भाईंदर आणि वसई-विरार उपनगरात येणारे उच्च मूल्य असलेली ड्रग्ज, चरस, गांजा हे नेपाळमार्गे बिहारातून भारतात आणली जातात आणि देशभर वितरित केली जातात. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये एमडी (मेफेड्रोन), चरस, कोकेन, हेरॉईन आणि गांजाचा समावेश आहे.
यासंदर्भात मुंबईतून पाच आरोपींना अटक करून 3 किलो चरस जप्त करण्यात आले, जे नेपाळमार्गे बिहारातून आणण्यात आले होते. त्याशिवाय मध्यप्रदेशातील तीन आरोपींना चरससह अटक करण्यात आली होती. तसेच ठाणे आणि गुजरात येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली, ज्यांच्याकडून 1,400 बाटल्या कोरेक्स कफ सिरप जप्त करण्यात आले होते.
11 महिन्यांत अटक करण्यात आलेल्या 62 आरोपींपैकी 12 नायजेरियन नागरिक असून ते मिरा-भाईंदर व नालासोपारा येथून अटक करण्यात आले आहेत. नयानगर येथील एका प्रकरणात 1.5 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले होते, ज्यात दोन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आले. तसेच 10 डिसेंबर रोजी वसईतील अचोळे पोलीस ठाण्याने रात्री गस्त घालताना एका परदेशी नागरिकाला एमडी ड्रग्जसह अटक केली. त्याच्याकडून 31 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. गेल्या 11 महिन्यांत 40 किलो ड्रग्ज बाजारात पोहोचण्यापासून पोलिसांनी रोखली आहेत.
आरोर्पीना पकडण्यासाठी आणि त्यांची पुरवठा साखळी नष्ट करण्यासाठी भारतभर नियोजन व कार्यवाही करावी लागते. वरिष्ठ अधिकार्यांच्या मदतीने परिसर ड्रग्ज मुक्त ठेवण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाचे विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढतात त्यावर निर्बंध आणणे गरजेचे असल्याचे नागरिक सांगत आहेत.