अंबरनाथ : शहराच्या पूर्व भागातील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या रेल्वे स्थानक परिसरातील कार्यालयावर दहा ते बारा जणांनी तलवारी नाचवून सशस्त्र हल्ला केला. सुदैवाने महाडीक कार्यालयात नसल्याने ते बचावले, मात्र या कार्यालयातील ऑफिसबॉय कृष्णा गुप्ता किरकोळ जखमी झाला आहे.
रेल्वे स्थानक परिसरातील बिकेबिन रोडवर माजी नगरसेवक रोहित महाडिक यांचे कार्यालय आहे. शनिवारी रात्री ते आपल्या कार्यालयातून घरी गेल्यानंतर काही वेळातच म्हणजे साधारण पावणे अकरा वाजता त्यांच्या कार्यालयावर दहा ते बारा जणांनी हातात तलवारी घेऊन व तोंडाला रुमाल बांधून हल्ला चढवला. महाडिक कार्यालयात नसल्याने त्यांनी ऑफिस बॉय गुप्ता यांच्यावर हा हल्ला केला. मात्र प्लास्टिकच्या खुर्चीने त्यांनी आपला बचाव केला. त्यात ते किरकोळ जखमी झाले. या हल्लेखोरांनी महाडिक यांच्या कार्यालयाची देखील पूर्णतः तोडफोड केली. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. हल्ल्याची घटना समजल्यानंतर रोहित महाडिक यांनी शिवाजी नगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना हल्ल्याची माहिती दिली.
यावेळी ऑफिस बॉय कृष्णा गुप्ता यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आशुतोष कराळ ऊ र्फ डक्या (23), गनी रफिक शेख (25) व इतर दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला का केला. महाडिक यांचे कुणाशी वैर आहे का? की यापेक्षा अन्य काही वाद आहे का? या सर्व शक्यता पोलीस तपासून पाहत आहेत. आरोपी मात्र अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येते.
मागील काही दिवसांत अंबरनाथ मध्ये गुन्हेगारी पुन्हा एकदा डोके वर काढू लागली असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. खून, हल्ले, दहशत, अंमली पदार्थांची विक्री, महिलांवरील अत्याचार अशा प्रकारात वाढ होत असतानाही संबंधितांकडून मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सद्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना पुन्हा एकदा पोलिसी खाक्या दाखवावा लागेल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.