डोंबिवली (ठाणे) : रिक्षा चालवून हातावर पोट भरणाऱ्या एका रिक्षावाल्यावर भयंकर आर्थिक संकट गुदरले आहे. दोन्ही बेरोजगार मुलांना रेल्वेत नोकरीला लावतो, असे अमिष दाखवून पश्चिम डोंबिवलीतील देवीचापाड्यात राहणाऱ्या या रिक्षाचालकाला ६ लाखांचा गंडा घातल्याचे विष्णूनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून उघडकीस आले आहे.
रिक्षाचालक राहत असलेल्या त्याच भागातील एका इसमाने नोकरी लावण्याच्या बदल्यात सहा लाख रूपये उकळले आहेत. नोकरी तर नाहीच, शिवाय पैसेही परत करत नसल्याने फसवणूक झालेल्या रिक्षा चालकाने बुधवारी (दि.23) या संदर्भात पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे
आत्माराम गोविंद पवार (५२) असे फसवणूक झालेल्या तक्रारदार रिक्षाचालकाचे नाव असून ते देवीचा पाड्यातील सत्यवान चौक परिसरात राहतात. तर त्यांची फसवणूक करणारा इसम हा त्याच भागातील रेतीबंदर क्रॉस रोडला असलेल्या आनंद दर्शन इमारतीत राहतो. ऑगस्ट २०२० ते जून २०२१ या कालावधीत हा आर्थिक व्यवहार झाला आहे. या प्रकरणी रिक्षाचालक आत्माराम पवार यांनी फसवणूक करणाऱ्या इसमाच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी हा अर्ज पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याच्या मंजुरीसाठी पाठवला होता. या अर्जाला उपायुक्त झेंडे यांनी मंजुरी दिल्यानंतर विष्णूनगर पोलिसांनी रिक्षाचालक आत्माराम पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
रिक्षाचालक आत्माराम पवार यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे, मुलांना नोकरीच्या कामासाठी पैसे उकळणारा इसम आपल्या परिचित आहे. आपल्या दोन्ही मुलांना नोकरीची गरज आहे. त्यांना कोठेतरी नोकरी लागावी यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे रिक्षाचालक पवार यांनी आपल्या परिचिताला सांगितले. रिक्षाचालकाच्या रडगण्याचा त्या इसमाने गैरफायदा घेतला. आपली रेल्वेमध्ये ओळख असून त्या आधारे आपण तुमच्या दोन्ही बेरोजगार मुलांना रेल्वेमध्ये नोकरीला लावू शकतो, असे सदर इसमाने अमिष दाखविले.
मुलांना नोकरी मिळणार असल्याने रिक्षाचालक आत्माराम पवार यांनी त्या इसमाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. ऑगस्ट २०२० पासून रिक्षाचालक पवार यांनी त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून मिळणारे पैसे, तसेच साठवलेल्या पुंजीतील असे एकूण सहा लाख रूपये टप्प्याने मुलांना नोकरी लावण्याच्या कामासाठी इसमाकडे जून २०२१ पर्यत दिले. संपूर्ण रक्कम भरणा केल्याशिवाय नोकरी लागण्याच्या प्रक्रिया पूर्ण होणार नाहीत, अशी त्या इसमाने रिक्षाचालक पवार यांना थाप मारली. त्यामुळे जवळ असलेली व उसनवार घेतलेली रक्कम पवार यांनी त्या इसमाला दिली.
सर्व रक्कम देऊन झाल्यानंतर रिक्षाचालक आत्माराम पवार यांनी मुलांच्या नोकरीची नियुक्तीपत्रे मिळण्यासाठी त्या इसमाच्या मागे तगादा लावला. मात्र हा इसम विविध कारणे सांगून वेळ मारून नेऊ लागला. पैसे देऊन पाच वर्षे उलटूनही सदर इसम आपल्या मुलांना नोकरी लावत नसल्याचे लक्षात आल्यानंतर रिक्षाचालक पवार यांनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. त्यालाही त्या इसमाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर त्या इसमाने आपली फसवणूक केल्याची खात्री पटल्यानंतर रिक्षाचालक आत्माराम पवार यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अनिल शिनकर अधिक तपास करत आहेत.