नेवाळी : कल्याण ग्रामीण भागातील डावले गावात घरफोडी करून चोरटे पसार झाले होते. या सराईत चोरट्याला अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं होत. मात्र पोलिसांनी यशस्वीरित्या तपासाला गती देत घरफोडी करणार्या किंगमेकर हैदर शेख याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून सुमारे दिड लाखांचा चोरीला सोन्याचा मुद्देमाल शिळ-डायघर पोलिसांनी हस्तगत केला आहे.
शिळ-डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डावले गावात शनिवार ते रविवारच्या दरम्यान चोरटयांनी घरातील दागिन्यांवर हातसफाई केली होती. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत दागिन्यांची चोरी करण्यात आली होती. चोरट्याने कोणत्याही प्रकाराचे पुरावे पोलिसांना पकडण्यासाठी ठेवले नसल्याने त्याला अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. मात्र गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी विशेष पथक तयार केले होते. यानंतर या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक लामखडे यांनी आपल्या सहकार्यांसह शोध सुरु केला होता. तपास करत असताना गुप्त बातमीदाराच्या मदतीने सिबली नगर परिसरात एक तरुण संशयास्पद रित्या फिरताना आढळून आला होता. त्याची कसून चौकशी करण्यास पोलीस पथकाने सुरुवात केली होती. यांनतर चोरट्याने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली.
हैदर अनुराला शेख हा पश्चिम बंगाल येथील राहणारा असून उदयनगर येथे वास्तव्याला आहे. त्याने रुकसाना कुरेशी यांच्या घरातून 38 ग्रॅम सोन्याचे 1 लाख 31 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली आहे.
शिळ डायघर पोलिसांनी अटक केलेल्या हैदर शेख याच्यावर ठाणे जिल्ह्यातील कळवा, बेलापूर, कोपरखैरणे, नवी मुंबई पोलीस ठाण्यात जबरी चोरी व घरफोड्यांचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी आहे. सध्या पोलिसांकडून अटक केलेल्या आरोपीची चौकशी सुरु असून त्याने अन्य काही चोर्या केल्या आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.