मिरा रोड (ठाणे) : भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीवर दोन नराधमाने मदत करण्याच्या बहाण्याने फायदा घेत गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर तातडीने पोलिसांनी दोन्ही आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.
भाईंदर पूर्वेला राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचे तीच्या सोबत राहणाऱ्या जोडीदाराशी भांडण झाल्याने ती भाईंदर पूर्व येथे काम करत असलेल्या परिसरातच फिरत होती, त्यावेळी पीडित तक्रारदार यांच्या सोबत कंपनीत काम करणाऱ्या ओळखीच्या मित्राला राहण्यास रूम आहे का विचारले असता त्यातील ३० वर्षे वयाच्या व्यक्तीने तिला एका गोदामाच्या ठिकाणी घेऊन गेला. त्याच्या मागोमाग दुसरा ४० वर्षीय आरोपी हा सुद्धा गेला. त्या ठिकाणी त्यांनी तिला
सांगितले की आज रात्री इथेच रहा आम्ही सुद्धा तुझ्या सोबतच राहू, म्हणून तिला जेवण सुद्धा दिले त्यानंतर पाणी पिण्यास दिले. त्यानंतर थोड्या वेळातच तिला चक्कर येऊन गुंगी आली. त्याचा फायदा घेत पीडितेवर या दोन्ही आरोपींनी बळजबरीने शारीरिक संबंध केले. त्यानंतर पीडितेला अस्वस्थ वाटू लागले म्हणून तिने तात्काळ रुग्णालयात जाऊन दाखल झाली. त्यावेळी पीडितेच्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी, महिला पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख यांनी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली व तात्काळ आरोपींना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३० ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे हे करत आहेत.