डोंबिवली : रस्त्यामधून चालणाऱ्या दोन जणांना कार चालकाने भोंगा वाजवून बाजुला होण्याचा इशारा दिला. त्याचा राग त्या दोघा पादचाऱ्यांना आला. या पादचाऱ्यांनी कार चालकाने भोंगा वाजविल्याच्या रागातून कार चालकाच्या वाहनाची रात्रीच्या वेळेत तोडफोड केली. या वादातून एकाने कार चालकाच्या कानशिलाला पिस्तूल लावून ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडला असलेल्या सांगाव येथील रविकिरण सोसायटी (चेरानगर) भागात हा प्रकार सोमवारी (दि.21) रात्री घडला. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. यामधील काही जण सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
कैलास भंडारी, रोशन लोखंडे, शिवम त्रिपाठी, नीतेश गुप्ता, तेजस म्हात्रे, नीर गोपाळ बुटेला, ओमकार मांडरे अशी गुन्हा दाखल झालेल्या तरूणांची नावे आहेत. त्यांच्यावर अग्निशस्त्र प्रतिबंधक आणि हत्यारे कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.21) रात्रीच्या सुमारास तक्रारदार नीलेश भोईर यांचा चुलत भाऊ जनार्दन भोईर आणि त्यांचे कुटुंबीय कारने सांगाव मधील त्यांच्या घरी परतत होते. भिका म्हात्रे चाळीजवळील रस्त्यावर दोन इसम रस्त्याच्या मध्यभागातून चालले होते. जनार्दन यांनी कारचा भोंगा वाजवून त्यांना बाजुला होण्याची सूचना केली. त्यावेळी दोन्ही इसमांनी जनार्दन यांच्याकडे रागाने बघितले. मात्र त्यांच्याशी वाद न घालता जनार्दन घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी भोईर कुटुंबीयांना घरासमोरील कारची काच फोडल्याचे दिसले. तक्रारदार नीलेश भोईर आणि वहिनी प्रणाली यांच्यासह कारची फुटलेली काच पाहत असताना तेथे दोन इसम आले. प्रणाली यांनी या दोन इसमांची काच फोडली असावी असा संशय व्यक्त केला. दोन इसमांपैकी एकाने आम्हीच काच फोडल्याचा दावा केला. त्यातील एकाने कमरेला खोचलेले पिस्तूल बाहेर काढून नीलेश भोईर यांच्या कानशिलाला लावून जीवे मारण्याची धमकी दिली. भोईर कुटुंबीयांनी ओरडाओरडा केल्यानंतर पळालेले दोन्ही तरूण सांगावमधील मोरेश्वर पार्क इमारतीत घुसले. भोईर कुटुंबीयांनी त्यांचा पाठलाग केला पण ते इमारतीमधून पळून गेले. त्यांच्या जवळील बॅग त्यांनी मोरेश्वर पार्क इमारतीच्या एका कोपऱ्यात फेकली होती. ही बॅग घेण्यासाठी एक तरूण आला असता जमावाने त्याला पकडून ठेवले. ही माहिती नीलेश भोईर यांनी मानपाडा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन बॅगची तपासणी केली. या बॅगमध्ये पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, 3 लोखंडी चाॅपर आढळले.
जमावाने पकडलेल्या तरूणाचे नाव नीर बुटेल (रा. 18, रा. नांदिवली) असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. जनार्दन भोईर यांनी कारचा भोंगा वाजविला म्हणून कैलास भंडारी, रोशन लोखंडे यांच्यात वाद झाला. या वादातून आम्ही सर्वांनी मिळून पहाटेच्या सुमारास येऊन जनार्दन भोईर यांच्या कारची काच फोडल्याची माहिती नीर याने पोलिसांना दिली. नीलेश यांंना पिस्तुलाने धमकाविणाऱ्या तरूणांची नावे शिवम त्रिपाठी आणि नीतेश गुप्ता असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कल्याण पूर्वेनंतर सांगाव भागात गुंड-गुन्हेगारांची वळवळ वाढली आहे. अशांचा बंदोबस्त करण्यासाठी या भागात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी रहिवासी करत आहेत.