आरोपी चैतन्य शिंदे Pudhari News Network
क्राईम डायरी

Thane | पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बाल लैंगिक अत्याचारी झाला फरार

कल्याण न्यायालयाजवळील घटना; तालुका पोलिस अडचणीत

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण तालुका पोलिसांच्या ताब्यात बाल लैंगिक अत्याचार गुन्ह्यातील (पाॅक्सो) आरोपी होता. या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी (दि.6) संध्याकाळी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात कोठडीची मुदत संपल्याने हजर केले होते. या आरोपीला पुन्हा व्हॅनमधून आधारवाडी तुरूंगात जमा करण्यासाठी पोलिस त्याला बेड्या घालत होते. इतक्यात आरोपीने दोन्ही पोलिसांच्या हाताला जोरात झटका देऊन पळ काढला. गर्दीचा फायदा घेऊन हा आरोपी रेल्वे स्थानकाच्या दिशेने पसार झाला.

चैतन्य राजू शिंदे (२१) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव असून तो रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील रोहिदासनगरचा रहिवासी आहे. सद्या तो रोहा रेल्वे स्थानक परिसरात राहत आहे. चैतन्य शिंदे याच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचा गेल्या वर्षी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यची चौकशी करून पोलिसांनी चैतन्यला अटक केली. चौकशीसाठी तो पोलिसांच्या ताब्यात होता.

आरोपी चैतन्य शिंदे याची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिस उपनिरीक्षक प्रशांत जाधव आणि त्यांचे सहकारी हवालदार रामदास राठोड यांनी त्याला शुक्रवारी संध्याकाळी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने चैतन्य शिंदेला २० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे चैतन्यची रवानगी आधारवाडी येथील तुरूंगात करण्यात येणार होती. कल्याणमधील आधारवाडी तुरूंगात नेण्यासाठी उपनिरीक्षक प्रशांत जाधव, हवालदार रामदास राठोड यांनी त्याला दंडाला पकडून न्यायालयातून बाहेर आणले.

कल्याण न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची व्हॅन उभी होती. चैतन्यला घेऊन जाण्यापूर्वी उपनिरीक्षक जाधव आणि हवालदार राठोड त्याला बेड्या लावत होते. इतक्यात संधी साधून चैतन्यने जाधव आणि राठोड यांच्या हाताला जोराने हिसका मारला आणि तो रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळत सुटला. दोन्ही पोलिसांनी चैतन्यचा तात्काळ पाठलाग केला. परंतु रेल्वे स्थानक आणि परिसरातील गर्दीचा फायदा घेऊन चैतन्य पसार झाला. तो कल्याण रेल्वे स्थानकातून लोकलने सीएसएमटी दिशेने पळून गेला असण्याचा संशय पोलिसांना आहे. हवालदार रामदास राठोड यांच्या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी फरार आरोपी चैतन्य शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक जानू पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फरार आरोपी चैतन्य शिंदे याला हुडकून काढण्यासाठी तपास चक्रांना वेग दिला आहे. हा आरोपी कुणाला आढळून आल्यास संबंधितांनी तालुका पोलिस किंवा महात्मा फुले चौक पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT