Crime News File Photo
क्राईम डायरी

ठाणे : होमिओपॅथी डॉक्टरांकडून ॲलोपेथिक उपचार; माणेरे गावातील दोघांविरोधात गुन्हा दाखल

केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची कारवाई; पोलिसांकडून चौकशीचा ससेमिरा सुरू

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आणि औषध विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार इलेक्ट्रो होमिओपॅथी पदवीधारकाला वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी नसल्याचे माहिती असूनही कल्याण पूर्वेकडील माणेरे गावात साई क्लिनिक नावाने दवाखाना थाटून डाॅ. देवेंद्र पुजारी, डाॅ. श्रीकृष्ण कुमावत या इलेक्ट्रो होमिओपॅथी पदवीधारकांनी वैद्यकीय सेवा सुरू ठेवल्याच्या तक्रारींची दखल घेऊन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने या दोन्ही डाॅक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची चौकशी करून त्यांच्या विरूध्द विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

केडीएमसीचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. समीर सरवणकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून या दोन्ही डाॅक्टरांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८, ३१९, सह वैद्यकीय अधिनियम १९६१ च्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कल्याणातील एका जागरूक डाॅक्टरने डाॅ. कुमावत आणि डाॅ. पुजारी यांच्या विरुध्द दोन वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारींना अनुसरून केडीएमसीने गोपनीय चौकशी सुरू केली होती. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. समीर सरवणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्राप्त झालेल्या तक्रारीप्रमाणे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मी स्वतः आणि सहकर्मचारी योगेश शेडगे यांच्यासह तक्रारदार मिळून उल्हासनगर ४ हद्दीत असलेल्या माणेरे गावातील साई क्लिनिक येथे संध्याकाळच्या सुमारास गेलो होतो. तेथे एक रूग्णाला सलाईन लावण्यात आले होते. हे सलाईन डाॅ. श्रीकृष्ण कुमावत यांनी लावल्याचे त्याने तपासणी पथकाला सांगितले. डाॅ. कुमावत यांच्यावर तपासणी पथकाने प्रश्नांची सरबत्ती केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. इतक्यात तेथे डाॅ. देवेंद्र पुजारी आले. त्यांनी आपली वैद्यकीय पदवी बी. ई. एम. एस. असल्याचे सांगितले. पथकाने त्यांच्याकडील वैद्यकीय पदवीची कागदपत्रे ताब्यात घेतली. या पदवीची खातरजमा करण्यासाठी ईलेक्ट्रो होमिओपॅथी महाराष्ट्र कौन्सिलकडे तपासणीसाठी पाठविले. कौन्सिलने डाॅ. पुजारी हे आमचे सदस्य असल्याचे आणि इलेक्ट्रो होमिओपॅथीत रूग्णसेवा करण्यास पात्र असल्याचा अहवाल दिला.

महाराष्ट्र शासन शिक्षण आणि औषध विभागाच्या ऑगस्ट २००० च्या शासन परिपत्रकाप्रमाणे इलेक्ट्रोपॅथी आणि इलेक्ट्रो होमिओपॅथी या मान्यताप्राप्त पॅथी नाहीत. अशाप्रकारची पदवी असलेले अहर्ताधारक कोणत्याही वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करू शकत नाहीत. त्यामुळे ते वैद्यकीय व्यावसायिक कायदेशीर नसल्याचे ठरतात.

वैद्यकीय व्यवसायाची (ॲलोपेथिक प्रॅक्टीस करण्याची) परवानगी नसताना डाॅ. पुजारी आणि डाॅ. कुमावत यांनी साई क्लिनिक नावाने दवाखाना थाटून रूग्णसेवा करून रूग्णांची फसवणूक केली आहे. त्यामुळे केडीएमसीचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. समीर सरवणकर यांनी या दोन्ही डाॅक्टरांच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गेल्या वर्षभरात उल्हासनगर परिसरातील सुमारे दहाहून अधिक बोगस डाॅक्टरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बोगस डॉक्टरांची संख्या लक्षणीय

उल्हासनगरसह कल्याण-डोंबिवलीच्या शहर व ग्रामीण पट्ट्यात परिसरात अशाप्रकारचे सुमारे २५ हून अधिक बोगस डाॅक्टर सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एक जागरूक डाॅक्टरने रूग्णांच्या आरोग्याचा विचार करून या बोगस डाॅक्टरांच्या विरुध्द आघाडी उघडली आहे. त्यानुसार गोपनीय चौकशी नंतर उल्हासनगरसह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला कारवाया करण्यास भाग पाडावे लागत आहे. अशा बोगस डॉक्टरांच्या विरोधात गुन्हे नोंदवून पोलिसांनी देखिल त्यांची चौकशी सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT