बाहेरख्यालीपणाला चटावलेली व्यक्ती कोणत्या थराला जाईल ते सांगता येत नाही. तिचा नवरा होता...सुखानं संसार सुरू होता, पण तिचं मन दुसर्यातच गुंतलं आणि तिला आपला नवरा नकोसा वाटू लागला. मग काय...याराच्या मदतीनं तिनं नवर्याचा काटा काढायचा बेत केला, पण नवरा तर गेलाच, पण त्याच्याबरोबर यार पण गेला आणि हिच्या नशिबी आला कारावास!
बार्शी तालुक्यातील पांगरी गावातील रूपाली पटाडे (वय 35) आणि शंकर पटाडे (40) हे दोघे नात्याने पती-पत्नी होते. विशेष म्हणजे दोघांचाही प्रेम विवाह झाला होता. दोघांच्या संसार सुखाचा सुरू होता. शंकर हा गाडीचालक होता तर रूपाली ही घरकाम करीत होती. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पण अचानक एका वळणावर रूपालीच्या आयुष्यात दुसराच कुणीतरी डोकावला आणि ज्याच्या साथीनं सात जन्माच्या आणाभाका घेतल्या त्याला सोडून रूपालीचं मन या नव्या याराभोवती पिंगा घालू लागलं आणि रूपालीनं स्वत:च्या सुखी संसाराचा सारीपाट उधळून लावायला सुरूवात केली.
बार्शीमधील 26 वर्षीय गणेश अनिल सपाटे याने रूपालीच्या आयुष्यात प्रवेश केला. हळूहळू दोघांचे चांगलंच मेतकूट जमलं आणि कानोकानी ही खबर शंकरच्याही कानावर गेली. रूपालीचा हा बाहेरख्यालीपणा शंकरला रूचणं शक्यच नव्हतं. त्यानं रूपालीला ताबडतोब गणेशचा नाद सोडायला सांगितला. पण गणेशच्या प्रेमात आकंठ बुडालेली रूपाली ही मानायला तयार नव्हती. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडायला लागले. त्यातून रूपाली आणि गणेश या दोघांनी मिळून शंकरचाच काटा काढायचा निर्णय घेतला.
18 फेब्रुवारी 2025 रोजी गणेश शंकरचा कायमचा काटा काढण्यासाठी त्याला तालुक्यातील बावी शिवारातील हॉटेलमध्ये ओल्या पार्टीसाठी घेऊन गेला. यावेळी गणेश आणि सोबतीला त्याचे दोघे मित्र घेतले. शंकरचा ’करेक्ट’ कार्यक्रम करायचा ठरवून दोघांनी दारू रिचवली. दारूचा अंमल चढल्यावर गणेशने शंकरला धाराशिवला कलाकेंद्रात जाऊ असे सांगितले. मध्यधुंद अवस्थेत सर्वजण कारने निघाले. गणेश सपाटे याने मनात प्लॅन केल्यानुसार एका पुलावर गाडी थांबवण्यास सांगितले. आपण पुलावर डान्स करू व फोटोही काढू असे त्याने सर्वांना सांगितले. मध्यरात्री त्यांनी पुलावर थांबून डान्स करण्यास सुरुवात केली.
आपण आनंदाने बेहोश झालो असल्याचे भासवून गणेश सपाटे यांनी शंकरला उचलून घेतले. ही संधी साधत सपाटे याने शंकरला पाण्यात ढकलले, मात्र शंकरनेही गणेशला मारलेली मिठी सोडलीच नाही. त्यामुळे शंकरबरोबर गणेश सपाटेही पाण्यात पडला आणि दोघेही बुडाले. दोघांनीही एकमेकांना मिठी मारल्यामुळे त्यांना एकमेकापासून सुटका करून घेणेही शक्य झाले नाही.
शंकर आणि गणेश या दोघांनी मारलेली मिठी ही आयुष्यातील शेवटची ठरली. उरलेल्या दोघा मित्रांनी त्यांना बुडालेले पाहून तेथून पोबारा केला. हळूहळू या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि ही बातमी पांगरी पोलिसांपर्यंत येवून पोहोचली. पांगरी पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत चौकशीसाठी म्हणून रूपालीला ताब्यात घेतले आणि सगळ्याच भानगडीला वाचा फुटली.
शेवटी पोलिसांनी शंकर आणि गणेश या दोघांच्या मृत्यूप्रकरणी रूपालीला अटक करून कारागृहात धाडले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. बाहेरख्यालीपणाच्या नादात रूपालीचा नवरा आणि यार तर बुडालाच, पण आपला सुखी संसारही स्वत:च्या हाताने बुडवून टाकाला.