क्राईम डायरी

कुटुंब कलह : मानसिक समानता!

Arun Patil

[author title="डॉ. प्रदीप पाटील, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व काऊंसेलर" image="http://"][/author]

बायकांनी असल्या गोष्टीत लक्ष घालायचं नाही… पुरुषांनी गप्प बसायचं, आमचं आम्ही बायका बघून घेऊ… तो लहान आहे अजून. त्याला काय समजतं?… तेवढी अक्कल तिला आहे का? जे जमत नाही ते तिने का करावे? ती कुठे सुंदर दिसते? आपली मुलगी तिच्यापेक्षा जास्त सुंदर आहे…

दुय्यम दर्जा!

अशा प्रकारचे बोलणे जेव्हा वारंवार एखाद्या कुटुंबात घोळून बोलले जाते तेव्हा त्या ठिकाणी एक वास्तव जळत असते. ते म्हणजे आपल्या कुटुंबातल्याच व्यक्तींना आपल्या बरोबरीचे न मानणे. आपल्यापेक्षा कमी लेखणे किंवा त्यांना कोणतीही किंमत न देणे, भेदभाव बाळगणे. समानतेचा आग्रह आपण सगळीकडे धरत असतो, पण समानता निर्माण करणे आणि ती मानसिकता टिकून ठेवणे ही अतिशय कठीण गोष्ट असते. जेव्हा आपल्या कुटुंबातल्याच इतर लोकांशी आपली तुलना सुरू होते किंवा ते एकमेकांशी तुलना करतात आणि अनेक गोष्टींवर कमी लेखू लागतात तेव्हा त्या कुटुंबात वारंवार भांडणं, वाद आणि स्फोट होत असतात!

असमानतेची विविध रूपे!

हे कमी लेखणं वेगवेगळ्या कारणांनी असतं… जसे की, स्त्री व पुरुष भेद मानणं. सक्षम असणं किंवा नसणं. पैसे कमावणारा असणं व नसणं. लहान वय आणि मोठं वय असा दुजाभाव मनात ठेवणं. जातीपातीचा भेदभाव मानणं. जेव्हा असे भेदभाव मनात रूजलेले असतात तेव्हा ते सतत बोलून दाखवले गेले की नाराजी निर्माण होते. कुटुंबात अविश्वासाचे वातावरण तयार होते आणि मग एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. कुटुंबातील एकाला जर सतत महत्त्व दिले जाऊ लागले की दुसरा नाराज होतो. त्यातून चढाओढीचे राजकारण शिजते. वेगवेगळ्या कारस्थानांचा जन्म होत राहतो आणि त्याला अंत उरत नाही.

असमानतेतून हिंसेकडे!

अशावेळी अनेक अपेक्षा आणि नियम एकमेकांवर लादले जातात. त्यातून कुरघोड्या चालू रहातात आणि मग कधीतरी हिंसा घडते. कुटुंबाचे मानसिक वातावरण जर असे असेल तर अख्खे कुटुंब हिंसाचाराच्या भक्ष्यस्थानी पडते. भेदभाव हा अनेक अंगाने होत असतो. सातत्याने भेदभाव होत राहिला तर रागाचा राक्षस मनातल्या मनात येरझार्‍या घालतो आणि मग सुडाची संधी शोधत राहतो. बेसावध क्षणी याच सुडातून जीव घेतला जातो!

सामाजिक समता, आर्थिक समता, जर समाजातच नसेल तर ती कुटुंबात प्रतिबिंबित व्हायला वेळ लागत नाही. मुळात शिक्षण व्यवस्थेमध्ये समतेचे शिक्षण अभिप्रेत असताना शाळा शाळांमधून सुद्धा ते व्यवस्थित दिले जात नाही. शाळांची व्यवस्था देखील श्रीमंतांच्या शाळा व गरिबांच्या शाळा अशा भेदभावातून चालू राहिलेल्या आहेत. मनात घट्ट रुतलेल्या याच भेदभावाच्या वागणुकीमुळे म्हातार्‍या लोकांचे वृद्धाश्रम उभे राहिले आहेत. गावाच्या बाहेर दलित वस्त्या उभ्या ठाकलेल्या आहेत. शहरामध्ये बकाल झोपडपट्ट्या तयार झालेल्या आहेत आणि धर्माधर्मांमध्ये हिंसाचाराचे उद्रेक चालू आहेत. स्त्रियांच्या वाटेला तर नेहमीच गौणत्व आलेले आहे!

भारतीय राज्यघटनेमध्ये पंधरावे कलम हे समतेचा पुरस्कार करणारे आहे. नुसत्या बोलण्यातून जरी कोणी भेदभाव केला तर कायद्याप्रमाणे 153 वे अ कलम हे अशा गोष्टींना बेकायदेशीर मानून शिक्षा सुनावते, पण कायद्याने सुधारणा होत नाहीत. शिक्षा होतात. जर लोकांच्या मनात बसलेला भेदभाव नाहीसा करायचा असेल तर त्यांना विवेकवादाचे, रॅशनॅलिटीचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी विशेष कष्ट घेऊन विवेक वादाचे प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक असते. पण हे लक्षात घेतो कोण?

SCROLL FOR NEXT