SIM Swap Scam
कोल्हापूर : कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागात राहणारा आदित्य. तो रोजच्यासारखाच सकाळी ऑफिसला निघाला होता. मात्र त्यावेळी त्याच्या फोनवरचे नेटवर्क गेले होते. काहीतरी नेटवर्क इश्यू असेल म्हणून त्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र, हे नेटवर्क कशामुळे गेले, हे समजण्याआधी खूप वेळ झाली होती. या बंद नेटवर्कने त्याचे खाते निरंक केले होते...
या खरेदीच्या निमित्ताने त्याच्या बँक खात्यातून लागोपाठ पैसे ट्रान्स्फर होत होते, अन् याची त्याला बिलकूल कल्पना नव्हती. कारण नेटवर्क नसल्याने त्याच्या मोबाईलवर कोणताही ओटीपी आला नव्हता किंवा कोणताही अलर्ट आलेला नव्हता. हे नेटवर्क नसण्यापाठीमागे एक वेगळाच इतिहास होता...
एक आठवड्यापूर्वी आदित्यला एका अननोन नंबरवरून फोन आला होता. फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने मोठ्या विनयाने त्याला सांगितले होते, 'नमस्कार सर, आम्ही आपल्या मोबाईल सेवेसंदर्भात एक लकी ड्रॉ घेतला होता आणि तुम्ही त्यात जिंकला आहात!'
फोनवर आत्मीयतेने बोलणाऱ्या त्या व्यक्तीने त्यानंतर आदित्यला काही तपशील विचारले. त्यामध्ये आधार क्रमांक, जन्मतारीख, बँक खात्याचा शेवटचा नंबर, वगैरे... अन् आदित्यनेही ती माहिती सहजपणे सांगून टाकली.
ही माहिती घेतल्यानंतर त्या दिवशी या सायबर चोरट्याने एक बनावट आधार कार्ड आणि आदित्यच्या नावाने नवीन सिम घेतले होते. आदित्यने माहिती दिल्यानंतर आदित्यचे सिम सायबर चोरट्यांकडे स्वॅप झाले होते. सायबर चोरट्यांचा लकी ड्रॉचा हा फंडा मात्र आदित्यला चांगलाच धडा शिकवून गेला. सध्या देशभरात सिम स्वॅप या सायबर सापळ्यात अनेक जण अडकत आहेत. याच सिम स्वॅपची माहिती देण्यासाठी आदित्य या पात्राचा आधार घेतला आहे.
'सिम स्वॅप स्कॅम' ही एक धोकादायक ऑनलाईन फसवणुकीची पद्धत आहे. ज्यामध्ये तुमच्या नावाने डुप्लिकेट सिम घेतले जाते आणि तुमचा मोबाईल नंबर सायबर चोरट्यांच्या ताब्यात जातो. मग बँक व्यवहारांसाठी लागणारी ओटीपी (वन-टाईम पासवर्डस्), अॅलर्टस् हे सगळे त्यांच्या मोबाईलवर येऊ लागते.
सायबर चोरटे अनेकदा मोबाईल सेवा, लकी ड्रॉ किंवा केवायसी अपडेटच्या नावाने फोन करतात. ते आपली वैयक्तिक माहिती मिळवून सिम स्वॅपची तयारी करतात. सिम स्वॅप झाल्यानंतर तुमच्याच नंबरवरून तुमच्याच मित्र-मैत्रिणींना फोन केले जातात आणि त्यांच्याकडून अडचणीत आहे असे सांगून पैसेदेखील उकळले जातात.
फोनवर अचानक नेटवर्क जाणे किंवा अचानक नो सर्व्हिस दाखवणे.
बँकेचे ओटीपी किंवा अॅलर्टस् येणे बंद होणे.
मोबाईल कंपनीकडून नवीन सिम अॅक्टिव्हेशनचा ई मेल / संदेश येणे.
मोबाईल, बैंक किंवा सोशल मीडिया अकाऊंटमधून अचानक लॉगआऊट होणे.
तुमचा मोबाईल नंबर म्हणजे तुमची डिजिटल ओळख आहे. एकदा का ती सायबर चोरट्यांच्या ताब्यात गेली, की तुमचे सगळे नियंत्रण संपेल. त्यामुळे सतर्क राहून आपला आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर, ओटीपी यांसारखी माहिती कोणत्याही अननोन व्यक्तीला देण्याच्या आधी एकदा नक्की विचार करा.