धुळे : शिरपूर तालुक्यातील ताजपुरी गावात माशांची भाजी कुत्र्याने खाल्ल्याच्या किरकोळ कारणावरून मुलाने जन्मदात्या आईचा दांडक्याने डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
ताजपुरी शिवारातील देवेंद्र भिलेसिंग राजपूत यांच्या शेतात टिपाबाई रेबला पावरा (वय 67) या मजुरी करत होत्या आणि तिथेच वास्तव्यालाही होत्या. त्यांचा मुलगा आवलेस रेबला पावरा (वय 25), खैरखुटी (ता. शिरपूर) येथे राहतो. त्याने आईला माशांची भाजी बनवण्यास सांगितले होते. मात्र, जेवणासाठी तयार केलेली भाजी कुत्र्याने खाल्ल्याचे लक्षात येताच मुलाने संतापाच्या भरात आईच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरात वार केला. यात टिपाबाई जागीच कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी मुलगा घटनास्थळावरून फरार झाला आहे. माहिती मिळताच थाळनेर पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच पोलिसांनी आरोपीला जवळच्या शेतात शोधून ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.