नाशिक : नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साडगाव शिवारात पारधी दाम्पत्याचा बुधवारी (दि. ६) मृतदेह आढळून आले होते. नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपास करीत दोघांचा खून करणाऱ्यास अटक केली आहे. शेतजमिनीच्या वादातून वृद्धेच्या सख्ख्या भावाने रविवारी (दि. ३) भाऊबीजेच्या दिवशीच बहिणीसह दाजीला लाकडी दांड्याने मारहाण करीत खून केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सोमनाथ सावळीराम बेंडकोळी (५०, रा. लाडची शिवार, ता. नाशिक) यास अटक केली आहे.
साडगाव शिवारात रामू राधो पारधी (७०) व चंद्रभागा रामू पारधी (६५) या दोघांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळून आले हाेते. दोघांना टणक वस्तूने बेदम मारहाण करीत जीवे मारल्याचे उघडकीस आले होते. दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करीत पोलिसांनी तपासास सुरुवात केली. नातलग, गावकऱ्यांकडे तपास केल्यानंतर पोलिसांना संशयित सोमनाथ याच्यावर संशय आला. त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर त्याने दुहेरी खुनाची कबुली दिली. पारधी दाम्पत्यास मूलबाळ नव्हते. त्यामुळे सोमनाथ हा पारधी यांच्या शेतजमिनीत हिस्सा मागत होता. तर चंद्रभागा पारधी या भावाकडे वडिलोपार्जित शेतजमिनीत वाटा मागत होत्या. त्यावरून दोघांमध्ये वाद होते.
भाऊबीजेच्या दिवशी संशयित सोमनाथ हा बहीण चंद्रभागाच्या घरी गेला. त्यावेळीही जागेवरून वाद झाल्याने त्याने लाकडी दांड्याने दोघांना बेदम मारहाण करीत खून केला. तीन दिवसांनी दोघांचा खून झाल्याचे उघडकीस आले. पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, सहायक निरीक्षक संदेश पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, हवालदार संदीप नागपुरे, हेमंत गिलबिले आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
संशयित मारेकरी सोमनाथ बेंडकोळी हा दोघांना मारल्यानंतर दोन दिवस बाहेर गेला. त्यानंतर घरी परतला. खुनाच्या तिसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर संशयित सोमनाथ हा घटनास्थळी गेला. जिल्हा रुग्णालयात, अंत्यसंस्कारात सहभागी झाला. तसेच दु:ख व्यक्त करून मी काही केलेच नाही या आविर्भावात वावरत होता. मात्र, नातलगांच्या चौकशीत सोमनाथबाबत चौकशी केल्यावर ते काहीच बोलत नसल्याने पोलिसांना त्याचा संशय आला. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली.