नाशिक | पुढारी ऑनलाइन डेस्क | नाशिक- काठे गल्ली सिग्नलनजीकच्या अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्यापूर्वी मंगळवार, दि. 15 एप्रिलला रात्री झालेल्या दगडफेकीच्या कटकारस्थानामध्ये टिप्पर गँगचा कुख्यात म्होरक्या छोटू ऊर्फ समीर पठाण याचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचा इंदिरानगर येथील अवैध जुगार अड्डा उद्धवस्त करण्यात आला असून 70 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सराईत गुन्हेगार समीर पठाण उर्फ छोटू पठाणचा अवैध जुगार अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट दोनने ही कारवाई केली असून कारवाईत तब्बल 70 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. इंदिरानगर हद्दीतील पेरुची बाग परिसरातील शेतात एअर कूलरच्या सोयीसुविधायुक्त असा हा आलिशान जुगार अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. काठेगल्ली येथील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढतेवेळी दगडफेक करणाऱ्या संशयितांत समीर पठाणचा सहभाग आढळल्याने तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
युनिट दोनचे अंमलदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना पाथर्डी गाव शिवारातील फ्लाईंग कलर्स स्कूलसमोर असलेल्या शेतातील शेडमध्ये तीनपत्ती जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशाने युनिट दोनचे प्रभारी सहायक निरीक्षक हेंमत तोडकर यांच्या पथकाने अड्ड्यावर छापा टाकला. जुगाराचे साहित्य व 15 दुचाक्यासह रोख रक्कम, पाच कार, एक रिक्षा, मोबाईल असा 70 लाखांचा मुद्देमाल जप्त करुन जागा मालकांसह क्लबचालक संशयित समीर पठाण याच्यासह 29 जणांविरोधात इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.