संजय सूर्यवंशी, बेळगाव
मीडिया अन् प्रेसच्या नावाखाली काहींनी आजकाल ब्लॅकमेलिंगचा धंदा चालवला आहे. यामध्ये यूट्यूबर्स सर्वात पुढे दिसून येतात. एका अधिकारी तरुणीचे तिच्या मित्रासोबतचे प्रणयरम्य क्षण छुप्या कॅमेर्यात टिपून त्याद्वारे त्यांनी 50 लाखांची खंडणी मागितली. परंतु, तरुणी धाडसी निघाली अन् तिने थेट तक्रार केल्याने तिघे तोतया पत्रकार अन् एका सरकारी अधिकार्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. घर बंद करून जाताना पायपुसणीखाली ठेवली जाणारी चावी या तरुणीला ब्लॅकमेलिंगच्या टोकापर्यंत घेऊन गेली...
गेल्या आठवड्यात बेळगावात पोलिसांनी आधी तिघा तोतया पत्रकारांना अटक केली. हे तिघेजण केवळ नावाला यूट्यूब चॅनेल चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी त्यांचा धंदा हा व्हिडीओ करून ब्लॅकमेलिंग करणे, हाच असल्याची आता चर्चा आहे. शहरातील एका नामांकित खात्यात काम करणारी ही तरुणी सरकारी अधिकारी आहे. ती मूळची अन्य जिल्ह्यातील असून, बेळगावात स्वतंत्र खोली करून राहात होती. तिच्या या स्वतंत्र खोलीत अनेकदा तिचा मित्र देखील येत असे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अनेकदा प्रणयक्रिडा चालत. परंतु, नेमका याचाच फायदा उठवण्याचा चंग त्रिकुटाने बांधला.
जेव्हा ही तरुणी तिच्या ऑफिसला जायची तेव्हा घराला कुलूप लावून चावी तिथेच पायपुसणीच्या खाली ठेवायची. ती चावी येथेच ठेवत होती, हे या तिघा यूट्यूबर्सना सांगणारा देखील तिचाच कार्यालयातील सहकारी होता. हे आता उघडकीस आले आहे. दरमहा एखाद्या सरकारी कार्यालयात जायचे अन् त्यांच्याकडून ठरावीक रक्कम घेऊन यायची, हा यूट्यूब चॅनेल चालवणार्यांचा आजकाल धंदाच बनला आहे. असेच हे त्रिकुट या सरकारी कार्यालयात देखील जात असे. तेथे त्यांना विनोद नामक एक सरकारी अधिकारी भेटला. किती दिवस अशी छोटीछोटी रक्कम जमा करत फिरणार, तुम्हाला एक मोठे घबाड मिळवून देतो, मी सांगतो तसे करा, असा सल्ला या विनोदने त्रिकुटाला दिला. अन् पुढचे सगळे घडले.
आपली जी सहकारी तरुणी आहे ती कुठे राहते, ती ऑफिसला येते कधी, परत जाते कधी, शिवाय घराची चावी कुठे लवपून ठेवते, याची इत्थंभूत माहिती विनोदने या त्रिकुटाला दिली. त्यांनीही याची माहिती घेऊन बरोबर सापळा रचला. जेव्हा ही तरुणी ऑफिसला गेली तेव्हा एक दिवस संधी साधून त्यांनी या तरुणीचे घर तिने पायपुसणीखाली लपवून ठेवलेल्या चावीने उघडले. ती ज्या बेडरूममध्ये झोपत होती, तेथील होल्डरमध्ये त्यांनी छुपा कॅमेरा सेट केला व पुन्हा होते तसे घर बंद करून ते निघून गेले. याच काळात ती तरुणी सायंकाळी घरी आली की आपल्या मित्राला बोलावून घेत असे. दोघे जेवण केल्यानंतर त्यांच्यातील प्रणयही रंगत होता. आपसूकच हे सर्व त्या छुप्या कॅमेर्यात कैद झाले होते. आठ-पंधरा दिवस गेल्यानंतर पुन्हा या त्रिकुटाने तिच्या ठेवलेल्या ठिकाणची चावी घेऊन घर उघडले व छुपा कॅमेरा काढून घेऊन गेले.
या कॅमेर्यात बरीच प्रणयरम्य द़ृश्ये असल्याचे लक्षात आल्यानंतर त्रिकुटाची पैशाची भूक वाढली. ही सरकारी अधिकारी आहे, अब्रूला घाबरून आपल्याला मागेल तितकी रक्कम देईल, असा विचार करून त्यांनी तिच्याकडे चक्क एक कोटीची मागणी केली. त्यातील 50 लाख तरी आता द्यायला हवेत, असा तगादा त्यांनी सुरू केला. काय करावे, हे न सुचल्याने आधी ही तरुणी गर्भगळीत झाली. परंतु, नंतर तिने धाडस करून पोलिस ठाणे गाठले अन् याबाबतची फिर्याद दिली. (पूर्वार्ध)