स्वप्निल पाटील, सांगली
बाहेरख्याली संबंधाला चटावलेली पत्नी... पत्नीकडून वारंवार होणार्या त्रासाला वैतागलेला तिचा पती... कुटुंबापासून पोलिस ठाण्यापर्यंत गेलेला दोघांचा वाद... मंदिरात झालेल्या त्यांच्या गांधर्व विवाहाचा शेवट अखेर दुसर्या राज्यातील एका उसाच्या शेतात झाला. जनावरांच्या गोठ्यात भैया म्हणून काम करणार्या तिच्या दुसर्या पतीने तिला ठार मारण्यासाठी रेल्वेने उत्तर प्रदेशमधून सांगलीच्या टाकळीत आणले. वडिलांच्या मदतीने पत्नीला ठार मारून पलायन केले... पण त्याच रेल्वेचे तिकीट त्याच्यापर्यंत पोलिसांना घेऊन आले.
साधारणत: 35 वर्षे वयाची नितू ऊर्फ शालिनी मूळची उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरची राहणारी. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमधीलच एकासोबत तिने घर बसवले. त्याच्यापासून तिला अपत्यही झाले. पण तिचे काही त्या घरात मन रमले नाही. तिने नवा मोहरा शोधायला सुरुवात केली. तिच्या या बाहेरख्याली वागण्याला पहिला पती वैतागलेला. पदरात पोर असूनही तिचे वागणे काही त्याला पटत नव्हते. त्यामुळे पहिल्या पतीने काडीमोड घेऊन नितूला मोकळे केलेले.
माहेरी राहणारी नितू चंचल स्वभावाची होती. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्याने ती आयुष्यभर साथ देणार्या जोडीदाराच्या शोधात होती. उत्तर प्रदेशमधील जौनपूरच्या लोकांचा बहुतांश जनावरे सांभाळण्याचा म्हणजेच भैया काम करण्याचा उद्योग. उत्तर प्रदेशमधील आकाश ऊर्फ विशाल दीनदयाळ यादव हा हैदराबाद येथे एका शेतकर्याकडे जनावरे सांभाळण्याचे काम करीत होता. 24 वर्षीय तरणाबांड गडी लग्नाळू होता. पण कुठे जुळत नव्हते. त्याचा एक मित्र नितू ऊर्फ शालिनीच्या संपर्कात होता. आकाशने मित्राकडून नितूचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यातून दोघांची ओळख झाली.
ती उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरमध्ये तर तो हैदराबादेत. दोघांच्या तासन् तास मोबाईलवर गप्पा रंगू लागल्या. दोघांनीही भेटायचं ठरवलं. त्यासाठी तो सुलतानपूरला आला. दोघेही सुलतानपूरमध्ये भेटले. दोघांची मैत्री आता प्रेमात रूपांतरित झाली होती. 35 वर्षीय नितू 24 वर्षीय आकाशवर भाळली होती. पहिले लग्न झालेले असतानाही तिने आकाशसोबत घर बसविण्याचा निर्णय घेतला. आकाशनेही तिला एका मंदिरात नेले, डोक्यात सिंदूर भरला व तिला आपली सहचारिणीही बनवले. दोघांनी घरात न सांगताच गांधर्व पद्धतीने विवाह उरकला होता. दोघेही चोरून एकत्र राहू लागले होते. दरम्यानच्या काळात आकाशच्या बहिणीचा विवाह होता. ही संधी साधून आकाशने नितूला घरी नेले व तिच्यासोबत विवाह केल्याचे सांगितले. हे ऐकून आकाशच्या घरच्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.
नितू आणि आकाश या दोघांचा विवाह आकाशच्या घरच्यांना मान्य नव्हता. त्यामुळे नितू आणि आकाशच्या कुटुंबामध्ये वारंवार खटके उडू लागले. दरम्यानच्या काळात नितू व्यसनाच्या आहारी जाऊ लागली होती. तसेच तिचे वेळी-अवेळी अनेक परपुरुषांशी मोबाईलवरून बोलणे वाढले होते. ते आकाशला खटकू लागले होते. यातून त्यांच्यात भांडणे होऊ लागली. नितू कधी आकाशसोबत सासरी राहायची; तर कधी माहेरी जाते, असे सांगून महिना-महिना गायब व्हायची. ती कुठे जाते याची काहीही कल्पना आकाशला नसायची. तिच्या वागण्याला आकाश आता अक्षरश: वैतागला होता. त्यातून दोघांमधील संबंध दिवसेंदिवस ताणले गेले. वारंवार खटके उडू लागले. याच दरम्यान नितूनेही आकाश याच्या कुटुंबाविरुद्ध उत्तर प्रदेशमधील पोलिस ठाण्यात शारीरिक, मानसिक छळाची तक्रार दिली. यामुळे आकाश आणखीनच संतापला. पण त्याने संयमाने घेतले. नितूला आपण वेगळे राहू, असे सांगून तक्रार मिटवून घेतली. नितूचा कायमचा काटा काढायचा विचार आता आकाशच्या डोक्यात सुरू होता. या विचारात तो रात्र रात्र जागू लागला.
काही वर्षांपूर्वी तो सांगलीतील मिरज तालुक्यातील टाकळीमध्ये एका जनावरांच्या गोठ्यात भैया काम करीत होता. त्यामुळे या परिसराची त्याला चांगलीच जाण होती. त्याला हीच जागा सुचली. त्याने डाव आखला. यामध्ये त्याने वडील दीनदयाळ यांनाही सहभागी करून घेतले. तेही सुनेच्या सततच्या त्रासाला वैतागले होते. त्यामुळे त्यांनीही होकार दिला. प्लॅन ठरला. आकाशने वेगळे राहण्याचा बहाणा करून नितूला सोबत घेतले. ठरल्याप्रमाणे वडील दीनदयाळही होतेच. तिघेही रेल्वेत बसले. पण रेल्वे उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्राच्या दिशेने धावू लागली तशी नितूच्या मनात पाल चुकचुकली. इकडे कुठे निघालो, अशी विचारणाही केली. पण आकाशने मी तिकडे काम बघितले आहे, तिकडे भरपूर काम आहे, तिकडेच जाऊ, असे तिला सांगितले. तिघेही 16 डिसेंबर रोजी रेल्वेतून मिरज जंक्शनवर उतरले. रिक्षातून टाकळीत गेले. दरम्यान रिक्षामध्ये पती-पत्नीत वाद सुरूच होता. टाकळीतील ओढ्यानजीक तिघेही उतरले. रिक्षाला परत पाठवले. वाद विकोपाला गेला, नितूच्या त्रासाला वैतागलेल्या दोघांनी तिला ओढत ओढ्याकाठी असणार्या उसाच्या शेतात नेले. तिच्याच अंगावरील शालीने तिचा गळा आवळला व त्याच दिवशी रेल्वेने पुन्हा उत्तर प्रदेशच्या दिशेने पलायन केले.
आठवड्याभराने शेतातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेत मालकाने जाऊन पाहणी केली तर त्याला धक्काच बसला. कुजलेल्या व भटक्या कुत्र्यांनी लचके तोडलेला अर्धवट अवस्थेत महिलेचा मृतदेह त्याला आपल्या शेतात दिसून आला. त्याने पोलिसांना माहिती दिली. मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. पण महिलेच्या धडापासून वरील भागच नसल्याने ती महिला नेमकी कोण, याचा तपास करणे पोलिसांना जिकिरीचे होऊन बसले. पण बाप-लेकाची एक चूक पोलिसांनी हेरली. तपास करताना चिखलात पडलेले एक रेल्वेचे तिकीट व त्या ठिकाणी दोन मोबाईल क्रमांकाचे लोकेशन पोलिसांना मिळून आले. तिकीट घेऊन पोलिसांनी मिरज रेल्वे स्थानक गाठले. त्यावेळी ते तिकीट पुण्यातून काढल्याचे निष्पन्न झाले. नितूच्या अंगावरील साडी, शालीच्या आधारे सीसीटीव्हीचा तपास सुरू झाला. त्यावेळी मिरज रेल्वे स्थानकातून नितू व आकाश आणि दीनदयाळ बाहेर पडताना दिसून आले. रेल्वे स्थानकाबाहेर चौकशी केली, त्यावेळी संबंधित रिक्षा चालकाने तिघांना टाकळीत सोडल्याचे व त्यांच्यात सातत्याने वाद सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान आकाशने रेल्वे स्थानकाबाहेर चिक्की विकणार्या विक्रेत्याच्या खात्यावर नातेवाईकांकडून 3 हजाराची रक्कम घेतली होती. त्याच्याकडे चौकशी केली व ऑनलाईन पैसे आलेला क्रमांक पोलिसांनी मिळवला.
पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीची तपासणी केली तेव्हा ते उत्तर प्रदेशातून येणार्या रेल्वेतून आल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी मिळालेल्या क्रमांकाचा तपास सुरू केला तर त्यातील एक क्रमांक दीनदयाळ व दुसरा क्रमांक त्याच्या पत्नीच्या नावे असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक तपास सुरू झाला. खुनानंतर आकाशने हरियाणामधील रोहतककडे तर त्याच्या बापाने उत्तर प्रदेशमधील जौनपूर तालुक्यातील खुज्झी या मूळ गावी पलायन केले होते. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके तत्काळ रवाना झाली. त्यांनी दोघांना बेड्या ठोकल्या. कोणताही सुगावा लागू नये म्हणून आकाशने पत्नीला महाराष्ट्रातील सांगलीच्या टाकळीत आणून काटा काढला. पण घटनास्थळी पडलेल्या रेल्वे तिकिटाचा पोलिसांना सुगावा लागला अन् ओळखही न पटलेल्या छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडलेल्या नितूच्या खुनाचा छडा लागला. पत्नीच्या बाहेरख्याली स्वभावाला अन् त्रासाला वैतागलेल्या आकाशला तिच्यापासून कायमची सुटका मिळेल असे वाटले. पण त्याच्या एका चुकीने त्याला पोलिस कोठडीपर्यंत आणून सोडले.