नाते (महाड तालुका, रायगड) : मध्यप्रदेश राज्यात खुन करून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वरंडोली गावात लपून बसलेल्या अजय सिंग पिता तिलक या आरोपीस महाड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मध्यप्रदेशमधील जवा जिल्हा पोलिसांना महाड तालुका पोलिसांनी या आरोपीला पकडण्यासाठी मदत केली आहे. अजय सिंग पिता तिलक राजसिंह असे या कुख्यात आरोपीचे नाव असून गेली चार महिन्यांपासून तो मध्यप्रदेश पोलिसांना गुंगारा देत होता.
मात्र मध्यप्रदेश पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि त्यांनी थेट महाड गाठले. संबंधित आरोपीवर खून करणे तसेच खून करून पुरावा नष्ट करणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे आरोप आहेत. महाड तालुक्यातील वरंडोली गावच्या हद्दीत एका फार्म हाऊसवर लेबर काम करीत असताना संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मध्य प्रदेश पोलीस टीम सोबत रवाना करण्यात आले.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड, पोलीस हवालदार अभिषेक पोटे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर भुसे, चालक पोलीस हवालदार पोटे यांच्या टीमने संबंधित आरोपीला पकडण्यासाठी महत्त्वाची मदत केली आहे.